गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यास विविध उपक्रम राबवावेत- जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे,दि. १७: शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण संस्थांमधील मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. त्याअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने सर्व गृहनिर्माण संस्थांनी विशेष सभा बोलावून सभासदांना मतदानाचे आवाहन करावे. मतदानाच्या तारखेचा उल्लेख असलेली निवडणूक विषयक भित्तीपत्रके संस्थेच्या दर्शनी भागात लावावीत. गृहनिर्माण संस्थांनी सभासदांना मतदार यादीत नाव शोधून द्यावीत, मतदार यादीत नाव नोंदविण्याची १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत संधी असून ज्यांची नावे मतदार यादीत नसतील त्यांचे अर्ज विहित मुदतीत भरून घ्यावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

मतदान चिठ्ठी पोहोचविण्यास केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मदत करणे, पात्र मतदारांची यादी तयार करुन मतदानाच्या दिवशी सकाळपासून मतदान केलेल्या मतदारांची नोंद घेणे, वृद्ध व दिव्यांग सभासदांसाठी मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी शक्य असल्यास वाहनाची व्यवस्था करणे, दुपारपर्यंत मतदान न केलेल्या सभासदांच्या भेटी घेऊन मतदान करण्याबाबत प्रेरित करावे, मतदान केलेले सभासद व नवमतदारांना गुलाबपुष्प अथवा भेट वस्तू देऊन सोसायटीमधील विशेष सोहळ्यात गौरविण्यात यावे, असे आवाहनही डॉ. दिवसे यांनी केले आहे.

मतदान जागृती उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गृहनिर्माण संस्थांमधील लेखा परीक्षकांच्या मदतीने सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपापल्या मतदार संघाशी निगडीत अधिकारी कर्मचाऱ्यांशी समन्वय ठेवावा, असेही प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *