आंबेगाव-शिरुरमध्येही युतीचं ठरलं,आघाडीचा इथेही घोळ कायम
उत्तम कुटे
पिंपरीःविधानसभा निवडणूक राज्यात काल जाहीर झाली.तरी,युती,आघाडीचा जागावाटप घोळ पूर्ण मिटलेला नाही.त्यातही आघाडीत तो तुलनेने जास्त आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव-शिरुर मतदारसंघही त्याला अपवाद नाही.तेथे युतीकडून अजित पवार राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उमेदवारीची घोषणाच काय ती बाकी आहे.मात्र,आघाडीत उमेदवारीचाच घोळ नाही,तर ही जागा कोणी लढवायची हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं ठरलेले नाही.
वळसे हे १९९० पासून सलग सातवेळा आंबेगावमधून निवडून आलेले आहेत.२०२४ त्यांची आठवी वेळ असणार आहे.गेल्यावेळी २०१९ ला त्यांनी शिवसेनेचे राजाराम बाणखेले यांचा ६६ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.सव्वा लाखाहून अधिक मते त्यांनी खेचली होती.दमदार प्रतिस्पर्धी नसल्याने दर पंचवार्षिकला त्यांचा असा जोरदार विजय झालेला आहे.शिवाजीराव आढळराव शिरुरचे शिवसेना खासदार असताना त्यांनी आपल्या पत्नी कल्पना यांना वळसेंविरुद्ध मैदानात उतरवले होते.त्यांचाही वळसेंनी ३७ हजारांहून अधिक लीडने पराभव केला होता.
लोकसभेला शरद पवार राष्ट्रवादीचे शिरुरमधील उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांना आंबेगाव मतदारंसघात १९,२५९ मतांचे मताधिक्य मिळाल्याने या पक्षाकडे विधानसभेला इच्छूकांचा ओढा वाढल्याचे दिसून आले आहे.त्यांच्याकडून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम हे मोठे दावेदार आहेत.त्यांच्यासह बांधकाम व्यावसायिक रमेश येवले यांनीही तयारी सुरु केलेली आहे.तर,ठाकरे शिवसेनेकडून सुरेश भोर,राजाराम बाणखेले,सुरेखा निघोट यांची नावे घेतली जात आहेत.१९९० पासून ही जागा शिवसेनाच लढत आहे.परिणामी ती ते सोडतील का हा ही प्रश्न आहे.यावेळी लोकसभेला युतीविरोधात राज्यात लाट दिसली.ती विधानसभेला पुन्हा दिसणार का हे निकालानंतरच कळणार आहे. तिचा प्रभाव आंबेगावमध्ये दिसून वळसेंचा पराभव होणार का,किमान त्यांचे मताधिक्य,तरी घटणार याकडे आता लक्ष लागलेले आहे.