पुणे एसआरए चे सीईओ शिरीष यादव यांच्याकडे आढळले मोठे घबाड
पिंपरीःशिरीष सरदेशपांडे यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) सूत्रे हाती घेतल्यापासून हा विभाग अॅक्टिव्ह मो़डवर आला असून त्यांनी मोठे मासे गळाला लावायला आता सुरवात केली आहे.१४ ऑक्टोबरला एका दिवसात त्यांनी लाचखोरीचे तीन,तर काल (ता.१६)लाचखोरीचे गुन्हे दाखल केले.काल एका क्लास वन अधिकाऱ्याला त्यांनी दणका दिला.
पुणे येथील झोपडपट्टी पुर्नवसन कार्यालयाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष रामचंद्र यादव यांनी एक कोटी ६८ लाख ७४ हजार ४४ रुपयांची बेहिशोबी संपत्ती (अपसंपदा) जमा केल्याबद्दल व बनावट बॉंड सादर करुन राज्य सरकारची फसवणूक केल्याबद्दल एसीबीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.त्यात साथ दिल्याबद्दल त्यांच्या पत्नी प्रतिक्षा यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे.एसीबीच्या अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे या त्यात फिर्यादी आहेत.
यादव यांना वरील मालमत्तेबाबत पुरेशी संधी देऊनही ते त्याबाबत समाधानकारक खुलासा देऊ शकले नाहीत.त्यामुळे ती त्यांनी भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमविल्याचे दिसून आल्याने हा गुन्हा त्यांच्याविरुद्ध नोंद करण्यात आला.त्यांच्या लाचखोरीत त्यांच्या पत्नीची ,साथ दिसल्याने त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.वरील संपत्ती ही त्यांच्या उत्पन्नापेक्षा २०.३४ टक्यांनी जास्त आढळून आली. एसीबीचे उपअधिक्षक अनिल कटके पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान,कालच एसीबीने आपली दुसरी कारवाई पुण्यातच केली.राज्य सरकारची विविध कार्यालये असलेल्या सेंट्रल बिल्डींग येथील प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या मुख्य लिपिक सुनीता रामकृष्ण माने (वय ४६) यांना १२ हजार रुपयांची लाच एका शाळाचालकाकडून घेताना त्यांनी पकडले.त्याबाबतही बंडगार्डन पोलिस ठाण्यातच लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.तक्रारदार शिक्षण संस्थाचालकाच्या दोन शाळा असून त्यात त्यांनी २५ टक्के आरटीई कोट्यातून प्रवेश दिला होता.या मुलांच्या फीचे एक लाख ६९ हजार १४१ रुपये राज्य शासनाकडून येणे होते.ते बिल देण्याकरिता माने यांनी एक टक्का लाच मागितली. ती कार्यालयातच घेताना त्यांना काल रंगेहाथ अटक करण्यात आली.