पिंपरी पेंढार आणि डुंबरवाडीत दोन बिबटे जेरबंद;आठवडेभरात ओतूर पिंपरी पेंढार परिसरात तीन बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

नारायणगाव :- (किरण वाजगे कार्यकारी संपादक)
गेल्या आठवड्यात जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात तीन बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील पिरपट परिसरात बुधवारी दि.९ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात येथील ४२ वर्षाची महिला सुजाता डेरे या मृत्युमुखी पडल्याची घटना घडल्यानंतर वनविभाग अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर वन विभागाने या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये शुक्रवारी दि.११ रोजी एक पाच वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी मंगळवारी दि.१५ रोजी रात्री पाच ते सहा वर्ष वयाचा दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात आला.तसेच डुंबरवाडी येथील गणेशनगर येथे बुधवारी पहाटे दोन ते अडीच वर्षाचा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.

डुंबरवाडी येथील गणेशनगर येथे देखील बुधवारी पहाटे बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरच्या वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक व्ही.ए.बेले, वनकर्मचारी गणपत केदार,किसन केदार, फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव आदी कर्मचारी घटनास्थळी जाऊन,पिजऱ्यासह बिबट्याला ताब्यात घेतले.तसेच वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरीक नितीन डुंबरे , देवराम डुंबरे,बन्सिधर हाडवळे ,दत्तात्रय हाडवळे व इतर ग्रामस्थांच्या सहकार्याने माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल केले.
सातत्याने बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यहानी व पाळीव प्राणी मारले जात असताना जुन्नर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी २८ पिंजरे लावले आहेत. तसेच ११ ट्रॅप कॅमेरे लावले असून थर्मल ड्रोन च्या साह्याने शोधकार्य सुरू असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *