पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक माधवराव मानकर यांना विधानपरिषदेची आमदारकी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी झाली असून गुप्ते मंगल कार्यालय येथे बैठक घेत ६०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार निवेदन देत सामुहिक राजीनामा दिला.
महाराष्ट्राचे मा. राज्यपाल यांच्या कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ३ सदस्यांची नियुक्ती होणार होती. त्यापैकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक माधवराव मानकर यांची नियुक्ती व्हावी अशी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्याकडे मागणी केली होती.
यावेळी पदाधिकारी यांनी सांगितले,श्री. दीपक भाऊ मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजितदादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शहराचे अध्यक्ष पदाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळत आहे. त्यांच्यामुळे पुणे शहरात पक्ष मजबूत झालेला आहे. मात्र तरीही पक्षाकडून श्री. दीपक भाऊना राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळालेली नाही. हि खूप मोठी चूक झालेली आहे. ज्यांच्या घरात आमदार-खासदार, मंत्री पदे आहेत त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. भविष्यात यामुळे पक्षाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. याची पक्षाकडून दखल घेण्यात यावी. पक्षाच्या कार्यकर्त्याला योग्य न्याय देणारे अजित दादा असा विश्वास आम्हा पदाधिकाऱ्यांमध्ये होता. पण दीपक भाऊना विधान परिषद आमदार न केल्यामुळे आज त्या विश्वासला तडा गेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व शहर, विधानसभा, विविध सेलचे पदाधिकारी सामुहिक राजीनामा देत आहोत, असे त्या निवेदनात म्हणले आहे. तसेच जोपर्यंत अजितदादाकडून ठोस शब्द मिळत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीचे अजिबात काम करणार नाही.
राजीनामा दिलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, कोथरूड विधानसभा महिला अध्यक्ष तेजल दुधाने, कॅन्टोन्मेंट विधानसभा महिला अध्यक्ष शशिकला गायकवाड, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अभिषेक बोके, कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, शहर उपाध्यक्ष सीमा साळवे, कॅन्टोन्मेंट विधानसभा कार्याध्यक्ष राहुल तांबे, युवक सेल अध्यक्ष समीर चांदेरे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष समीर शेख, युवती सेल अध्यक्ष पूजा झोळे, विध्यार्थी सेल अध्यक्ष शुभम माताळे, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष जयदेव इसवे, ओबीसी सेल अध्यक्ष हरेश लडकत, सोशल मीडिया सेल अध्यक्ष शीतल मेदने, माहिती अधिकार सेल अध्यक्ष दिनेश खराडे, व्यापारी सेल अध्यक्ष वीरेंद्र किराड, बचतगट सेल अध्यक्ष अश्विनी वाघ, मेडिकल सेल अध्यक्ष विजय बाबर यांनी आपल्या कार्यकारणीसह राजीनामे दिले आहेत.