बिगूल वाजला, २० नोव्हेबरला विधानसभेसाठी मतदान,तर २३ तारखेला निकाल

सत्ता युती कायम ठेवणार की आघाडी सत्तेत येणार हे २३ नोव्हेंबरला कळणार

उत्तम कुटे
पिंपरीःमोठी प्रतिक्षा असलेला विधानसभा निवडणुकीचा बिगूल अखेर महाराष्ट्रात मंगळवारी (ता.१५) वाजला.त्यानुसार २० नोव्हेंबरला मतदान,तर त्यानंतर तीन दिवसांनी(ता.२३) निकाल लागणार आहे.त्या दिवशी युती राज्यातील सत्ता ठेवणार की आघाडी पुन्हा सत्तेत येणार हे कळणार आहे.

mostbet

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी दिल्ली येथे पत्रकापरिषदेत महाराष्ट्र व झारखंडमधील निवडणुकीची घोषणा केली.यावेळी त्यांनी दोन्ही राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.तेथील मतदार,मतदान केंद्र यांची माहिती दिली.प्रथम त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल तेथील मतदारांचे खास आभार मानले

महाराष्ट्रात एकाच टप्यात मतदान होणार आहे.त्यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.दुसऱ्या दिवशी त्यांची छाननी होईल.तर, ४ नोव्हेंबर ही अर्ज माघारीची मुदत आहे.२० नोव्हेंबरला मतदान होऊन २३ तारखेला मतमोजणी होणार आहे.राज्यातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपत असल्याने त्यापूर्वीच राज्यात नवी विधानसभा व सरकारही अस्तित्वात येणार आहे

राज्यात नऊ कोटी ३ लाख मतदार असून त्यात चार कोटी ९३ लाख पुरुष आहेत.त्यात १८ लाख ६७ हजार हे नवमतदार असून ते प्रथमच मतदानाचा हक्का बजावणार आहेत. मात्र,तेथे मतदानाला येऊ न शकणाऱ्यांसाठी घरून मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच लोकसभेप्रमाणे यावेळी सुद्धा अपंग मतदारांना मतदानाची मतदान केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था केली गेली आहे.एक लाख १८६ मतदानकेंद्र राज्यभर असणार आहेत.

निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्याची सक्त सुचना महाराष्ट्रातील प्रशासनाला करण्यात आल्याचा आवर्जून उल्लेख मुख्य़ निवडणूक आयुक्तांनी यावेळी केला.पक्षपातीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केले आहे.गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना त्याबाबत वर्तमानपत्रात माहिती द्यावी लागणार असल्याची त्यांनी आठवण करून दिली.