एकमेकांच्या जागांवर क्लेम करण्याचा युती,आघाडीचा खेळ सुरुच
उत्तम कुटे
पिंपरीःउद्योगनगरीतील पिंपरी या राखीव विधानसभा मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आमदार असतानाही तेथे भाजपने दावा ठोकला होता.त्यामुळे युतीत थोडा पेच निर्माण झाला होता.त्यानंतर आता आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादीने पिंपरीसह भोसरी आणि चिंचवड अशा तिन्ही जागा लढण्याचा ठरावच शनिवारी (ता.५) केला.त्यामुळे भोसरी व पिंपरीवर दावा ठोकलेल्या आघाडीतील ठाकरे शिवसेनेची गोची झाली.तसेच आघाडीतही सारे काही आलबेल नसल्याचे यातून दिसून आले.
आघाडीतील शिवसेनेचा भोसरीसह पिंपरीवरही दावा आहे.पिंपरीत,तर २०१४ ला त्यांचे आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार होते.त्यामुळे तेथे ताकद असल्याने ती जागा मिळावी,असा त्यांचा क्लेम आहे. तेथे अजित पवार राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आमदार आहेत भोसरी हा दुसरा मतदारसंघ यापूर्वी शिवसेनेने लढविलेला आहे.तेथेही ताकद असल्याने ती जागाही पक्षाने घ्यावी,असा तेथील ठाकरे शिवसेनेचे इच्छूकच नाही,तर पदाधिकारी,कार्यकर्त्यांचीही मागणी आहे.तेथे पूर्वी लढलेल्या सुलभा उबाळे या पक्षाच्या महापालिकेतील आक्रमक माजी गटनेत्या दावेदार आहेत.असे असताना शरद पवार राष्ट्रवादीने भोसरीसह शहरातील तिन्हा जागा लढवाव्यात,असा ठराव शनिवारी केला.त्यामुळे त्यांचा मित्र पक्ष ठाकरे शिवसेनेची आता गोची झाली आहे.
शहरात पवारसाहेबांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने तिन्ही जागा मोठ्या फरकाने जिंकू शकतो,असा दावा या ठरावात शरद पवार शहर राष्ट्रवादीने केला आहे. तसेच तिन्ही ठिकाणी निष्ठावंतांनाच प्राधान्याने उमेदवारी द्यावी,असे त्यात पुढे म्हटले आहे. त्यामुळे तिकिटासाठी ऐनवेळी पक्षात आलेले व येणाऱ्यांचीही गोची करण्यात आली आहे. एकमताने मंजूर केलेल्या या ठरावाची प्रत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पक्षाच्या संसदीय मंडळाला देण्यात येणार आहे.चिंचवडमधून शहराध्यक्ष तुषार कामठे,महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर,पिंपरीतून माजी नगरसेविका डॉ .सुलक्षणा शिलवंत-धर, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे,सामाजिक न्याय विभाग प्रमुख मयूर जाधव,सचिन गायकवाड,तर भोसरीतून माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख,दत्ता जगताप इच्छुक असून त्यांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येणार आहेत,असे कामठे यांनी या ठराव बैठकीनंतर सांगितले. पक्ष फूटीनंतर अडचणीच्या काळात पक्षात जे पवारसाहेबांबरोबर थांबले,त्यांचाच प्राधान्याने विचार पक्ष करेल,असे ते म्हणाले. पवारसाहेब नक्कीच आम्हा निष्ठावंतांना न्याय देतील,असा आशावाद शेख यांनी व्यक्त केला.तर,या ठरावानुसार ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांचे पूर्ण ताकदीने काम करू, असे निंबाळकर म्हणाल्या.