घोडेगाव येथे श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक-भक्तांची गर्दी

घोडेगाव – (ता.आंबेगाव )येथील श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाची गाव प्रदक्षिणा मिरवून श्री शनैश्वर मंदिरात भक्तीभावाने प्रतिष्ठापणा करण्यात आली असून दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.
श्री तुळजाभवानी मातेच्या श्रमनिद्रासाठी बनवण्यात येणाऱ्या लाकडी पलंगाच्या भागांचे आगमन घोडेगाव येथे झाल्यावर श्री शनैश्वर मंदिर,घोडेगाव येथे पलंगाच्या बांधणीचे काम करायला सुरुवात होते. काम पूर्ण झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे घोडेगाव शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढून श्री शनैश्वर मंदिरात त्याची स्थापना करण्यात आली.

पलंगाची स्थापना केल्यानंतर तुळजापूरला पाठविण्याची परंपरा यादव काळापासून आजपर्यंत चालू आहे. या पलंगाची बांधणी करण्याचा मान घोडेगावच्या तिळवण तेली समाजास आहे .तुळजाभवानी पलंगाची स्थापना गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी होते त्यानंतर दहा दिवस येथील मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम होतात. घोडेगाव परिसरातील भाविक दर्शनासाठी मंदिरात येत असतात. .दहा दिवसानंतर पलंगाचे पुढील मुक्कामासाठी प्रस्थान केले जाते. मजल दरमजल करीत विजयादशमीच्या दिवशी तुळजापूर येथे पलंगाचा प्रवेश झाल्यानंतर त्या ठिकाणी तुळजाभवानीची स्वयंभू मूर्ती पलंगावर विराजमान केली जात असते विजयादशमी ते कोजागिरी पौर्णिमा या काळात तुळजाभवानी माता याच पलंगावर विश्रांती घेत असते.घोडेगाव येथे प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर दहा दिवस याच ठिकाणी त्याची पूजा अर्चा, गोंधळ, भजन,दिवसभर चालू असते.या काळात महिला वर्गाची दर्शन घेण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे.

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *