आम आदमी पक्षाचे चेतन बेंद्रे यांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या फडात शड्डू ठोकला असून विधानसभेसाठी कॅम्पेन सुरु केले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात ‘आप’ ने मोठ्या जोमाने कंबर कसली आहे. विधानसभेसाठी राज्यात ‘आप’ च्या मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि वरिष्ठ नेत्यांनी त्या दृष्टीने आदेशही दिले आहेत. अगदी अल्प काळात उद्योगनगरी बनलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आयटी वर्ग मोठ्या प्रमाणावर स्थिरावला आहे. याच मतदारसंघात असंघटित कामगार, घरेलू कामगार यांचीही मोठी संख्या आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील सर्वच नागरिक प्रामाणिकपणे कर भरत आहेत. परंतु मतदारसंघात त्यांचा योग्य प्रतिनिधी नसल्यामुळे त्यांची आर्थिक लूट होत आहे. या व्यतिरिक्त दैनंदिन समस्या आहेत, तो भाग वेगळा।
शहरात इतरही प्रश्न ‘आ वासून’ उभे आहेत. वाहतूक कोंडींचा प्रश्न तर पिंपरी चिंचवडकरांच्या पाचवीला पुजला आहे. त्यामुळे येथील नागरिकांचीच इच्छा आहे की आपले प्रश्न मांडणारा एक प्रतिनिधी मतदारसंघात हवा आहे, त्यांनी पर्याय शोधले पण असा खंबीर लोकप्रतिनिधी त्यांना भेटलाच नाही. त्यांना आपला वाटणारा, त्यांचे प्रश्न धडाडीने मांडणारा, तुमच्या घरातीलच प्रतिनिधी आता धावून येत आहे. ‘चिंचवडचा चेतन’ ही वेबसाईट लॉन्च करण्यात आली असून या कॅम्पेनच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न मांडले जातीलच, परंतु त्याचबरोबर ते मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी माहिती ‘आम आदमी पार्टी’ चे महाराष्ट्र राज्याचे पदवीधर आघाडीचे अध्यक्ष ‘चेतन बेंद्रे’ यांनी दिली.
सोमवारी, दि. १२ ऑगस्ट रोजी हॉटेल घरोंदा, मोरवाडी येथे पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी चिंचवड मतदारसंघातील आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्षा मीनाताई जावळे, उद्योग आघाडीचे सचिव संतोषजी इंगळे, प्रचार प्रमुख अय्याज सय्यद, उपाध्यक्ष राज चाकणे, मीडिया प्रमुख यशवंत कांबळे, संघटक संजय मोरे, रणधीर नायडू आदी उपस्थित होते. याचसोबत ‘आप’ चे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही उपस्थिती लावली.
पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि लॉ चा विद्यार्थी असलेल्या चेतन बेंद्रे यांनी पक्ष स्थापनेपासून पक्षाचं काम सुरु केलं आहे. मागील आठ वर्षापासून शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आंदोलने, मोर्चे काढून मतदारसंघातील अनेक प्रश्न मागौं लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यातच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तयारीही सुरु केली आहे. याच माध्यमातून त्यांनी ‘चिंचवडचा चेतन’ ही वेबसाईट लॉन्च केली आहे. यामध्ये मतदारसंघातील समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा ऊहापोह करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘आम आदमी पार्टी’ नेही मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. यातच राज्यातील स्थानिक नेत्यांना विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत चेतन बेंद्रे यांना विचारले असता. ते म्हणाले की, “हो हे खरं आहे, की राज्यात आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत. यात आता आम आदमी पार्टी विधानसभा निवडणूक आघाडीत लढणार की स्वतंत्र लढणार हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. परंतु वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांना विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत