महोश लांडगेंची डोकेदुखी वाढणार!रवी लांडगे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात?

भोसरी विधानसभा मतदार संघाच्या राजकारणात मोठी उलथापालात होत आहे . भाजप आमदार महेश लांडगे यांच्या विरोधातील सर्व शक्ती आता पूर्ण ताकदिने कामाला लागल्यात. ज्या मुळे महेश लांडगे यांचे चांगलेच टेन्शन वाढले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून इच्छुक असलेल्या माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आमदार लांडगे यांच्या दहा वर्षांच्या कामाचा सोशल मीडियातून अक्षरशः पंचनामा सुरू केलाय. महाआघाडीतून स्वतः शरद पवार यांनी अजित गव्हाणे यांची भोसरीतून उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. इतकेच नाही तर त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी भोसरीत राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेचे जंगी स्वागत झाले आणि दणदणीत सभा झाली. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी धडाकेबाज भाषणे करत भाजप आमदार लांडगे यांच्यावर तोफ डागली आणि एकप्रकारे प्रचाराचा नारळ फोडला. भाजपचे महेश लांडगे यांच्या विरोधात तगडा उमेदवार राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे अशी अत्यंत चुरशीची लढत होणार, अशी चर्चाही सर्वत्र सुरू झाली. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेनेही भोसरीसाठी आग्रह धरल्याने रंगत वाढली आहे.

माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी आजवर आमदार महेश लांडगे यांच्यावर तोफ डागत ही लढाई कायम सुरू ठेवली. आता त्यांच्या मदतीला भाजपमधील एक दमदार नाव जोडले जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात भाजपची पाळेमुळे खोलवर रुजविणारे दिवंगत माजी शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांचे सख्खे पुतणे माजी नगरसेवक रवि लांडगे हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश कऱणार आहेत. लांडगे यांनी शनिवारी मुंबई येथे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची दै. सामना कार्यालयात जाऊन भेट घेतली. तब्बल अर्धा तास दोघांमध्ये भोसरी मतदारसंघावर चर्चा झाली. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या गैरव्यवहारांची मालिकाच बाहेर येत असल्याने पक्षात आणि जनतेतही त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी असल्याचे लांडगे यांनी स्पष्ट केले. निवडूण येण्याचे समिकरण सांगताना, शिवसेनेची स्वतःची अशी ५० हजार मते आजही कायम असून त्यात महाआघाडीची मते एकत्र घेतल्यास आमदार महेश लांडगे यांचा पराभव अटळ असल्याचे, रवि लांडगे यांनी सांगितले. चर्चेअंती स्वतः राऊत यांनी, भोसरी हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, महाआघाडीत तो आम्हीच लढणार असल्याचे सांगितले. रवि लांडगे यांनी आपल्या कुटुंबाची नाळ थेट जनसंघापासूनच भाजपशी कशी जोडलेली आहे, मात्र पक्षातून वारंवार कसा अन्याय होत गेला याचे विस्ताराने कथन केले. अखेर संजय राऊत यांनी रवि लांडगे यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब केले आणि ताबडतोब प्रवेशाची सुचना केली. शिवसेनेचे संपर्कनेते सचिन आहेर यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील. जागावाटपात ही जागा शिवसेनेला सुटली तर सर्व मिळून जोमाने लढणार आणि नाही सुटली तरी महाआघाडीचा कोणीही उमेदवार असो त्याचेच काम करतील, अशी ग्वाही रवि लांडगे यांनी यावेळी दिली. आता महाआघाडीचा उमेदवार नेमका कोण असेल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. महाआघाडीत दुफळी निर्माण झाली तर त्याचा आयताच फायदा महायुतीचे आमदार लांडगे यांना होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *