आळंदीत इंद्रायणी नदीचे जल प्रदूषण ; नदी फेसाळली

आळंदीत इंद्रायणी नदीचे जल प्रदूषण ; नदी फेसाळली
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील तीर्थक्षेत्र आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने, नदीतील जल प्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले असून नदीला जलप्रदूषणासह जलपर्णीचा विळखा पडला असून जलपर्णी समस्यां जैसे थे आहे. इंद्रायणी नदीत पिंपरी चिंचवड महानगरपरिषद हद्दीतून रसायन व मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने नदी पांढऱ्या फेसाने पुन्हा एकदा फेसाळली असून केमिकल रसायन मिश्रित पाणी थेट सोडले जात असल्याने भाविक, नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.


इंद्रायणी नदीचे सातत्याने होत असलेले जलप्रदूषण वाढल्याने भाविक, वारकरी आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. पिंपवड महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अंकुश प्रदूषण करणाऱ्या घटकांवर राहिला नसल्याने वारंवार नदी पांढऱ्या शुभ्र प्रदुषित पाण्याने फेसाळल्याचे दिसत आहे. आळंदीत इंद्रायणी नदीतून नगरपरिषदेच्या पाणी साठवण बंधाऱ्यात प्रचंड प्रदूषित पाणी, जलपर्णीसह महापालिका हद्दीतून येत आहे. इंद्रायणी नदीवरील पाणी साठवण बंधारा अनेक ठिकाणी दगड निखळले आहेत. यामुळे गळती असून सद्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला असला तरी नदीचे वाढते प्रदूषण तीर्थक्षेत्र विकासाची शोकांतिका उघड करीत आहे. देखभाल दुरुस्ती अभावी नदी वरील भक्त पुंडलिक मंदिर परिसरात पाणी साठविण्यावर बंधारा गळतीने मर्यादा आली आहे. येथील बंधा-यासह कोल्हापूर पद्धतीचे बंधा-याचे गळती रोखण्यासह पाणी पुरवठा केंद्राकडील बंधाऱ्याची देखील देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्याची उपाययोजना करण्याची मागणीसह नदी प्रदूषण रोखण्याची मागणी देहू रानजाई प्रकल्पाचे प्रमुख सोमनाथ आबा, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना निवेदने देऊन केली आहे. मात्र पुणे जिल्हा प्रशासनाचे नदी प्रदूषण रोखण्याचे उपाय योजनांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.


आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर भाविक श्रींचे मंदिरात दर्शनासह तीर्थक्षेत्रातील स्नान महात्म्य जोपासण्यास येतात. आळंदीतून इंद्रायणी नदी वाहते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून नदीत थेट मैला व रसायन मिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट नदीत सांडपाणी व रसायन, मैला, मिश्रित पाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषण प्रचंड वाढले आहे. शुक्रवार ( दि. २१ ) इंद्रायणी नदी पांढऱ्या रंगाचे फेसाने पुन्हा फेसाळल्याने नदी प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याने आळंदीत नदी प्रदूषण वाढले आहे. वाढत्या जल प्रदूषणाने अलंकापुरीत भाविक व नागरिकां मधून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विचारसागर महाराज लाहुडकर यांनी सांगितले. पिंपरी महापालिकेने इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याचे कामास सुरुवात केली असून काम अगदी संथ असल्याने पालखी सोहळ्याचे गांभीर्य दिसत नाही. आळंदी स्मशान भूमी परिसरातील नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचून राहिल्याने परिसरातील नागरिकांना यांचा त्रास होत आहे. येथे नदीत राडा रोडा साचल्याने तसेच नदीत मोठ्या प्रमाणात राडा रोडा टाकला जात असल्याने नदीचे पात्र उधळ झाले असून गवताचे प्रमाण वाढले आहे.


राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षाने नदी प्रदूषण वाढले
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षाने इंद्रायणी नदीचे प्रदूषणात वाढ झाली आहे. नदीतील जलप्रदूषित करणाऱ्या घटकावर गुन्हे दाखल करून कारवाई अभावी नदी प्रदूषण परिसरात वाढले आहे. आळंदीला पाणी पुरवठा केंद्रात येणारे पाणी देखील प्रचंड प्रदूषित असल्याने आळंदी नगरपरिषदेस अखेर भामा आसखेडच्या पाण्याची मागणी करून शुद्धीकरणावर यंत्रणेवरील ताण कमी करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *