नारायणगाव : बिबट्याच्या हल्यात चार वर्षीय बालकाचा हृदयद्रावक मृत्यू

(किरण वाजगे, कार्यकारी संपादक)

आळे (ता.जुन्नर) गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका चार वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती अशी की या बालकावर बिबटयाने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवार दि.९ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली होती. आळेफाटा येथील डॉक्टर आवारी हॉस्पिटल येथे या बालकावर उपचार सुरू असताना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आळे (ता.जुन्नर) गावातील तितर मळ्यात रहात असलेले अमोल भुजबळ यांचा शिवांश हा साडेतीन वर्षाचा मुलगा अंगणात आजोबा बरोबर खेळत होता.
अचानक समोरील उसाच्या शेतातुन आलेल्या बिबट्याने मुलावर झडप टाकून उसाच्या शेतात फरफटत नेत असताना या ठिकाणी असलेल्या अविनाश गडगे या तरूणाने ही घटना पाहिली त्याच वेळेस त्याने मोठी हिम्मत दाखवत बिबट्याच्या मागे पळत जाऊन त्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यातुन सोडवले. परंतु या हल्ल्यात लहान बालक गंभीर जखमी झाले होते. त्याच्यावर आळेफाटा येथील डॉक्टर आवारी यांच्या दवाखान्यात उपचार सुरू होते.
आळे परिसरामध्ये चार बिबटे फिरत असल्याने या परिसरात मोठी बिबट्याची दहशत पसरली आहे. या ठिकाणी भर दिवसा दररोज बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत असते. वाढत्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल झालं असून येथील शेतकऱ्यांसह सर्व ग्रामस्थांना दिवसाही बिबट्याच्या दहशतीखाली जगावं लागत आहे. त्यामुळे आळे ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला असून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला नाही तर आळेफाटा चौकामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आळे ग्रामस्थांनी दिला आहे. जुन्नर तालुक्यात सर्वच ठिकाणी बिबट्यांची मोठ्या प्रमाणावर संख्या असताना वनविभाग या वाढत्या बिबट्यांवर का नियंत्रण ठेवू शकत नाही असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
याबाबत वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *