विधवा अनिष्ट प्रथा बंदचा खोडदच्या ग्रामसभेत एकमुखाने ठराव : समाजासमोर ठेवला आदर्श : खोडद करांचे सर्वत्र होतेय कौतुक

नारायणगाव : दिनांक ०५
बातमी : (किरण वाजगे कार्यकारी संपादक, रवींद्र खुडे विभागीय संपादक)


शुक्रवार दि २ जून २०२३ हा खोडद ग्रामसभेचा दिवस एक ऐतिहासिक दिवस असाच ठरला. कारण ग्रामपंचायत आणि ग्रामविकास मंडळ खोडद यांच्या पुढाकाराने आणि जुन्नर पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अधिकारी व खोडद गावच्या सुकन्या निर्मला अनंथा कुचिक यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रामसभेत महिला आणि पुरुष ग्रामस्थ यांच्या लक्षणीय उपस्थितीत विधवा प्रथा निर्मूलन ठराव एकमताने पास झाला. या ठरावामुळे समाजासमोर एक आदर्श घालून देण्याचा प्रयत्न खोडद ग्रामस्थांनी केलाय. याबद्दल सर्वत्रच खोडदकरांचे कौतुक होत आहे
सभेत गावामध्ये अंत्यविधीवेळी विधवा झालेल्या महिलेची बांगडी फोडणे, मंगळसूत्र व जोडवी काढणे, कुंकू पुसणे यासारख्या कुप्रथा पूर्णतः बंद करण्याचा निर्णय झाला. तसेच विधवा महिलांना सर्वच धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमात सन्मानाने आणि बरोबरीने सहभागी करून घेतले जाईल याबाबतही ग्रामस्थांमध्ये एकमत झाले. यावेळी वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मकरित्या वडाच्या रोपट्याची विधवा महिलांच्या हस्ते पूजा करून, त्याचे वृक्षारोपण निर्मला कुचिक यांचे हस्ते करण्यात आले. तसेच सर्वांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी विधवा महिलांच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव प्रकर्षाने जाणवत होता.
खोडद येथे याआधीच म्हणजे महिलादिनी 8 मार्च रोजी, गावामध्ये विधवा महिलांचा सहभाग असणारा हळदी कुंकवाचा भव्य कार्यक्रम घेतला गेला होता. सुमारे 500 महिलांच्या उपस्थितीत अनेक विधवा महिलांनी त्यांच्या वेदना बोलून दाखवल्या होत्या. त्याचवेळी विधवा प्रथा बंद करण्याच्या दृष्टीने सगळ्या उपस्थित महिलांनी निर्धार केला होता. त्यावर आजच्या ग्रामसभेत ठरावाद्वारे शिक्कामोर्तब झाले.


याकामी भरीव सहयोगाबद्दल सभेमध्ये निर्मला कुचिक तसेच गावातील सगळ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर यांचा गावच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी निर्मला कुचीक यांनी आपल्या मनोगतात आपल्या माहेरच्या लोकांचे कौतुक करताना सांगितले की, “समस्त खोडद करांनी ग्रामसभेत अनिष्ट व प्रचलित सर्व विधवा प्रथा निर्मुलनाचा ऐतिहासिक ठराव पास करून, यापुढे सर्वच सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचा जो निर्णय एक मुखाने घेतलाय, ही कृती खूपच स्तुत्य असून यामुळे इतरही ग्रामपंचायती पुढे येऊन असे ठराव करतील यात शंका नाही”
कार्यक्रमावेळी खोडदच्या सरपंच मनीषा गुळवे, सदस्य निर्मला थोरात, शुभांगी काळे, योगेश शिंदे, रवी मुळे, नवनाथ पोखरकर, गणपत वाळुंज, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष रवींद्र वामन, पंढरीनाथ खरमाळे, सुदाम गायकवाड, सुजन घंगाळे, पंढरी थोरात, राहुल वामन, गुंडीराज थोरात, रोहिदास डोके, विशाल पानमंद, संतोष मुळे तसेच माजी सरपंच शंकर थोरात, जालिंदर डोंगरे मामा, विश्वास घंगाळे, रंजना घंगाळे, शांताबाई चौधरी उपस्थित होते. तसेच बाळासाहेब शिंदे, शैलेश गायकवाड, इंद्रभान गायकवाड, अशोक खरमाळे, निवृत्ती थोरात, पानमंद सर, पंढरीनाथ तांबे, संजय कुचिक, शिवाजी खरमाळे, संतोष काळे, प्रदीप बेल्हेकर, गीताबाई खरमाळे, मुख्याध्यापिका नीता दळवी आणि ग्रामस्थ व महिलांचा लक्षणीय सहभाग होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते अवधूत खरमाळे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र वामन यांनी केले, तर आभार रवींद्र मुळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *