नारायणगाव : एकाच मुलीने केली दोन मुलांबरोबर लग्न! साडेचार लाख रुपयांसह दागिने लंपास

लग्न जमवणाऱ्या एजंटांसह नवरी मुलीवर गुन्हा दाखल

खोडद व  गुंजाळवाडी (आर्वी)  ता.जुन्नर येथील शेतकरी कुटुंबातील दोन तरुणांबरोबर दीड महिन्यात एकाच मुलीचा (नाव बदलून) विवाह लावून सुमारे साडेचार लाख रुपयांची फसवणूक झाली असून नवरी दागिने व पैसे घेऊन पसार झाली आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी एका महिलेसह तीन एजंटावर  गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
या प्रकरणी लग्न जमवणारा तोतया एजंट बाळु गुलाब सरवदे ( राहणार गुंजाळवाडी,आर्वी ता.जुन्नर), शिवाजी कुरकुटे ( राहणार बोटा, ता.संगमनेर) मीरा बन्सी विसलकर ( राहणार घोटी उभाडे, जि. नाशिक,  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सागर प्रभाकर वायकर (वय ३३,रा. गुंजाळवाडी,ता.जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर  वायकर हा शेतकरी कुटुंबातील पदवीधर तरुण आहे. ते शेती व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. आर्थिक परिस्थिती गरीब असल्याने व नोकरी नसल्याने त्यांचे लग्न जमवन्यात अडचण येत होती. लग्न जमवणारा मध्यस्थी बाळु सरवदे व मीरा विसलकर यांनी सागर  वायकर  यांना संध्या विलास बदादे (वय २३,राहणार  मु. विठ्ठल नगर, पोस्ट निळवंडी ता. दिंडोरी, जि.नाशिक ) असे नाव असलेल्या एका मुलीचा फोटो व्हॉट्सपवर पाठवला. त्या नंतर बोलाचाली होऊन १० मे २०२३ रोजी लग्न करावयाचे ठरले. मुलीची परिस्थीती बेताची असून तिला

वडील , भाऊ, बहिण नसुन आई एकटीच आहे. ती आजारी असल्याने लग्न करायचे असेल तर मुलीच्या आईसाठी  १ लाख ३० हजार रुपये द्यावे लागतील असे  मीरा विसलकर व बाळु सरवदे यांनी सांगितले. या गोष्टीवर विश्वास ठेवून वायकर यांनी पैसे दिले. त्या नंतर ठरल्या प्रमाणे  १० मे रोजी शिवपार्वती विवाह सोहळा केंद्र भाईकोतवाल चौक, जुन्नर येथे वैदीक पध्दतिने लग्न झाले. जुन्नर कोर्टामध्ये नोंदणी करण्यासाठी वधू , वर गेले असता वधूच्या कागदपत्रामध्ये अनियमितता असल्याने  नोंदणी झाली नाही. त्या नंतर १७ मे रोजी रोजी  पत्नी संध्या हिला मीरा बन्सी विसलकर या माहेरी घेऊन गेल्या. त्या नंतर संध्याला वारंवार फोन केला, परंतु आजारी असल्याचे कारण सांगून तिने सासरी येण्यास टाळाटाळ केली. दरम्यान २८ मे २०२३ रोजी वायकर यांनी मीरा  विसलकर यांना फोन केला असता संध्या ही पळून गेली आहे. तुम्हाला लग्नासाठी दुसरी मुलगी देते. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करू नका. असे विसलकर यांनी सांगितले. या मुळे आपली फसवणूक झाली असल्याचा संशय वायकर यांना आला. दरम्यान वायकर यांनी चौकशी केली असता आपल्या बरोबर विवाह झालेल्या मुलीचा विवाह अश्विनी रामदास गवारी असे बनावट नाव सांगून २८ मार्च २०२३ रोजी मीरा  विसलकर व शिवाजी कुरकुटे यांनी खोडद येथील हारीश बाळशिराम गायकवाड यांच्या सोबत लावून दिला.त्या नंतर अश्विनी  गवारी व एजंट पसार झाले. विवाह जमवण्यासाठी गायकवाड यांच्याकडून विसलकर हिने १ लाख ६० हजार रुपये घेतल्याचे समजले. बनावट नाव वापरून एकाच मुलीचा सागर वायकर व हरीश गायकवाड यांच्या सोबत विवाह करून दागिने व रोख रक्कम अशी सुमारे साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दिलेल्या फिर्यादी वरून नारायणगाव पोलिसांनी तीन एजंटावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याच प्रकारे आळेफाटा येथील तरुणाबरोबर १८ मे रोजी आळंदी येथील मंगल कार्यालयात विवाह करून अडीच तोळे सोन्याचे दागिने व एक लाख रुपये रोख रक्कम घेऊन फसवणूक झाल्या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अशाप्रकारे बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलीस शोध घेत आहेत. याच प्रकारे जुन्नर सह आंबेगाव तालुक्यातील  पाच ते सहा तरुणांची फसवणूक झाली असून बदनामीच्या भीतीने ते तरुण तक्रार देण्यास पुढे येत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *