राहुल गांधींना मोदी सरकार घाबरले म्हणूनच निलंबनाची कारवाई – आ. प्रणिती शिंदे

पिंपरी, पुणे ( दि. ३१ मार्च २०२३ )


देशात पंतप्रधान मोदींची हिटलरशाही – आ. प्रणिती शिंदे

सरकार विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये असंतोष – डॉ. कैलास कदम

खासदार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे धाबे दणाणले आहेत. म्हणूनच राहुल गांधी यांना विविध प्रकरणांमध्ये अडकवून त्यांची खासदारकी रद्द करून निलंबनाची कारवाई केली आहे. याविरुद्ध देशातील काँग्रेस पक्ष आणि अन्य विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवला आहे. सर्वसामान्य जनता हे सर्व पाहते आहे. आता देशातील नागरिक भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. मागील आठ वर्षांपासून पंतप्रधान मोदींची हिटलरशाही सुरू आहे, अशी टीका करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांची खासदारकी निलंबित करण्यात आली तसेच सरकारी बंगला सोडण्यास सांगण्यात आले. याविरुद्ध कॉंग्रेसने देशभरात पत्रकार परिषद घेऊन ‘जय भारत सत्याग्रह’ अभियान सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांची शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी महापौर कविचंद भाट तसेच श्याम अगरवाल, अशोक मोरे, सायली नढे, नरेंद्र बनसोडे, कौस्तुभ नवले, ॲड. उमेश खंदारे, डॉ. वसीम इनामदार, ज्ञानेश्वर मलशेट्टी, झेवियर ॲन्थनी, मिलिंद फडतरे, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, किरण नढे, आकाश शिंदे, रवि कांबळे, विजय ओव्हाळ, बाबासाहेब बनसोडे, गौतम ओव्हाळ, जॉर्ज मॅथ्यू, जितेंद्र तांब्या, मेहबूब शेख आदी उपस्थित होते.
देशातील अनेक बड्या नेत्यांवर ईडी, सीबीआयच्या धाढी टाकून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दबाव तंत्राचा वापर करून मोठ्या नेत्यांना भाजपमध्ये आणायचे आणि विरोधी पक्ष संपवून टाकायचे असे धोरण मोदींनी अवलंबले आहे. महाराष्ट्रात देखील घटनाबाह्य सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाही. विरोधकांचा आवाज दाबून एककल्ली कारभार सुरू आहे. माध्यमांनी यावरती आवाज उठवला पाहिजे. भारताची ओळख गांधी – नेहरूंचा देश अशी आहे; मोदी म्हणजे भारत नाही. आरएसएसची विचारसरणी ही महिला विरोधी आहे. त्यामुळेच भाजप महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहतो. ही शोकांतिका आहे भाजप आणि संघ परिवार पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. मात्र आता काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, त्याविरुद्ध आवाज उठवत राहील असेही आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. तसेच स्थानिक पातळीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार होत आहे विरोधकांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र निवडणुका घ्या काँग्रेसचा विरोधी पक्ष तसेच सर्वसामान्य नागरिक भाजपला घरी बसविल्या शिवाय राहणार नाही असे शिंदे म्हणाल्या.
राहुल गांधी यानी ७ फेब्रुवारीला संसदेत अदानी घोटाळ्यासंदर्भात प्रश्न विचारले. अदानी उद्योग समुहात गुंतवलेल्या शेल कंपन्यातील २० हजार कोटी रुपये कोणाचे ? यामध्ये एक चिनी नागरिकाचाही सहभाग आहे. हा चिनी नागरिक कोण ? उद्योगपती गौतम अदानी व नरेंद्र मोदी यांचा संबंध काय? विमानतळ, संरक्षण क्षेत्र ऊर्जा क्षेत्रात मोदी सरकारने अदानीला कशी मदत केली. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेश दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी अदानीला सोबत घेऊन गेले व तेथील कंत्राटे देण्यासाठी दबाव आणला याचे राहुल गांधी यांनी कागदपत्रासह पुरावे दिले. राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेत अदानी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला परंतु या दोघांच्या भाषणाचा भागच संसदेच्या कामकाजातून वगळण्यात
आला. अदानी घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती गठित (JPC) करून चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने लावून धरली आहे. परंतु मोदी सरकार संसदेचे कामकाजच चालू देत नाही. सत्ताधारी पक्षच संसदेचे कामकाज चालू देत नाही. काँग्रेस पक्ष जेपीसीची मागणी करताच संसदेचे कामकाज स्थगित केले जाते. अदानीला वाचवण्यासाठी मोदी सरकार सर्व शक्ती पणाला लावत आहे. मोदी सरकारमधील मंत्र्यानी राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावले, त्यावर राहुल गांधी यांनी संसदेत उत्तर देण्याची तयारी दाखवली पण त्यांना बोलण्याची परवानगीच दिली जात नाही. राहुल गांधी यांनी संसदेत अदानी घोटाळ्यावर मोदी सरकारला प्रश्न विचारल्यानंतर १९ दिवसानंतर राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानीचे प्रकरण बाहेर काढण्यात आले. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि २४ तासातच त्यांची खासदारकी रद्द केली व आता सरकारी घर खाली करण्याची नोटीस पाठवली. मोदी सरकार राहुल गांधी यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई करत आहे. अदानी घोटाळ्याची चर्चाच होऊ नये म्हणून भाजपा जाणीपूर्वक राहुल गांधींवर खोटे आरोप करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहे. परदेशात राहुल गांधी यांनी देशविरोधी वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे पण त्यात काहीही तथ्य नाही.राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असा भाजपाकडून धादांत खोटा आरोप केला जात आहे. नीरव मोदी, ललीत मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत. भाजपा ओबीसी समाजाचा संबंध भ्रष्टाचाऱ्यांशी जोडून ओबीसी समाजाचाच अपमान करत आहे. काँग्रेस पक्षात ओबीसी समाजाचा योग्य सन्मान राखला जातो असेही आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
डॉ. कैलास कदम म्हणाले, मागील साडेतीन वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांना तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशाने दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यानंतरच्या कार्यकाळात सलग तीन वर्ष पवना धरण क्षेत्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. मागील दोन महिन्यांपासून पिंपरी चिंचवड शहराच्या उत्तर भागातील तळवडे, चिखली, मोशी, डूडुळगाव, चऱ्होली, भोसरीतील काही परिसरात भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. वाढीव पाणी कोठा मिळून देखील अद्यापही शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम भाजपचे पुढारी आणि प्रशासन करत आहे, हे भाजपचे अपयश आणि प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे. पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनी द्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प मागील आठ वर्षापासून जैसे ते परिस्थितीत आहे. या प्रकल्पात आत्तापर्यंत शेकडो कोटी रुपये ठेकेदारांच्या घशात घालण्यात आले आहे. भाजपचे पुढारी शहरातील नागरिकांना या प्रकल्पाविषयी जाणून बुजून संभ्रम निर्माण करीत आहे. भाजपचे पुढारी याविषयी शहरात वेगळे बोलतात व मावळात विरोधी भूमिका घेतात. सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये प्रशासकीय राजवट असून राज्यात व केंद्रात भाजप सत्तेत आहे. शहरातील नागरिकांच्या वतीने मागणी करतो की, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा व शहरातील पाणी प्रश्न सोडवावा. भाजपच्या काळात महानगरपालिकेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे उदाहरणार्थ महानगरपालिकेच्या वतीने चिखली येथे उभारण्यात येणारे हॉस्पिटल मंजुरी मिळताच प्रशासनाने मोशी येते स्थलांतरित केले यामध्ये 200 कोटींची वाढ करण्यात आली ही सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाची लूट आहे. याविषयी आम्ही काँग्रेसच्या वतीने वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहोत. आमदार प्रणिती शिंदे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भाजपच्या कार्यकाळातील भ्रष्टाचारा विषयी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून भाजपाच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करावा अशी मागणी शहरवासीयांच्या वतीने करत आहे असेही डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेनंतर खासदार राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी शहर कॉंग्रेसने सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहीमेला प्रतिसाद देत आमदार प्रणिती शिंदे यांनी नाशिक फाटा येथे उपस्थित राहून स्वाक्षरी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *