तळेगाव ढमढेरे महाविद्यालयातील व्याख्यानमालेत, अनेक नावाजलेल्या मान्यवरांची व्याख्याने

विभागीय संपादक रवींद्र खुडे.
तळेगांव ढमढेरे / शिरूर : दि. २९/०३/२०२३


 

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या तळेगाव ढमढेरे येथील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या व तळेगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयात, शिक्षण प्रसारक मंडळ व शकुंतला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, सलग चौथ्या वर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
दि. २७ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ञ डॉ केदार फाळके यांचे, “छत्रपती शिवाजी महाराज – काल, आज आणि उद्या,” या विषयावरील व्याख्यान झाले. यावेळी बोलताना डॉ फाळके म्हणाले की, इतिहासाकडे बघण्याचा आपल्या सर्वांचा दृष्टिकोन शास्त्रीय आणि सकारात्मक असायला हवा. इतिहासातून योग्य तो संदेश घेऊन भविष्यातील नियोजन करायला हवे. धैर्य, निष्कलंक चारीत्र्य, तत्वनिष्ठा, स्वराज्याची संकल्पना आणि आरमार उभारणी ही शिवरायांची पंचसूत्री होती. आजही या धोरणांची समाजाला तितकीच आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आजच्या जागोजागी नैराश्य दाटलेल्या समाजव्यवस्थेत राजे शिवराय यांचे कार्य, धोरण, नियोजन आणि पराक्रम नवी ऊर्जा देत आहे. आरमाराची उभारणी हे शिवरायांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे द्वार आरमाराच्या रूपाने खऱ्या अर्थाने शिवरायांनी जगाला खुले करून दिले.
महाराजांनी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही, हा महाराजांचा खूप मोठा पैलू युवकांनी लक्षात घ्यायला हवा. व्यापक दूरदृष्टी ही शिवरायांच्या कारभाराची खासियत होती. आजच्या राज्यकर्त्यानी त्याची दखल घेण्याची गरज आहे. जगातील कोणतीच गोष्ट अशक्य नाही हा शिवचरित्राचा सर्वात मोठा संदेश असल्याचे डॉ फाळके यांनी यावेळी सांगितले.
पहिल्या दिवशी डॉ दत्तात्रय कारंडे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. मनोहर जमदाडे यांनी आभार व्यक्त केले.

 

व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांनी, “भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान,” या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना सांगितले की, महाराष्ट्र हे देशाचा इतिहास घडविणारे राज्य आहे. मराठेशाहीने देशाच्या इतिहासाचा प्रवाह आणि दिशा बदलली. त्यामुळे आपल्या राज्याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा. येथील संत, पंत आणि तंत यांनी महाराष्ट्राची वैचारिक आणि सामाजिक जडणघडण केली. त्यामुळे सातत्याने देशाला समृद्ध असा वैचारिक आणि प्रबोधनाचा वारसा देण्याचे काम महाराष्ट्राने केले.
महाराष्ट्रावर सातत्याने परकीय आक्रमणे होत गेली. इथली संस्कृती आणि परंपरा बिघडविण्याचे अनेक प्रयत्न महाराष्ट्राच्या भूमीवर झाले. मात्र याही परिस्थितीत महाराष्ट्र सावरला हे महत्वाचे आहे. मराठे हे इतिहासाला वळण देनारे आणि इतिहास घडविणारे लोक आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे प्रबोधनाचा आणि शौर्याचा वारसा पुढे नेणारे राज्य आहे. छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला स्वाभिमान दिला, शौर्य दिले. त्यामुळेच मराठेशाहीचा दबदबा सबंध हिंदुस्थानभर निर्माण झाला होता”.
इंग्रजी विभाग प्रमुख डॉ पराग चौधरी यांनी प्रास्ताविक आणि मान्यवरांचा परिचय करून दिला. डॉ दत्तात्रय कारंडे यांनी सूत्रसंचालन तर व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. पद्माकर गोरे यांनी आभार प्रदर्शन केले.

दि. २९ मार्च २०२३ रोजी म्हणजे व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी, पुण्यातील प्रतिभा महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्राचार्य डॉ राजेंद्र कांकरिया यांनी “वैज्ञानिक दृष्टिकोन आणि युवक” या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमास वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष भंडारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ कांकरिया बोलताना म्हणाले की, “यापुढील काळात युवकांना विदीर्ण अशा प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे. आज जग जवळ आले आहे. यामध्ये माणसाचीच खूप मोठी मेहनत आहे. परंतु भविष्यातील आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला तारणार आहे. संत तुकाराम, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्रवीर सावरकर, छत्रपती शिवराय अशा महापुरुषांनी देखील सातत्याने विज्ञान वादाचा पुरस्कार केला. अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही. नव्या पिढीने देखील हा आदर्श जोपासणे गरजेचे आहे. निरीक्षण, तर्क आणि निष्कर्ष ही विज्ञानाची त्रिसूत्री आहे. याच अनुषंगाने विज्ञानाचे विविध प्रयोग करून अंतिम शोध लागत आहे. वस्तुनिष्ठता ही विज्ञानाची मूलभूत संकल्पना असून, अंधश्रध्दा हा समस्त मानवजातीला लागलेला शाप आहे आणि त्यामुळेच आपण सामाजिक अधोगतीकडे जात आहोत. आजच्या काळात हे समाजव्यवस्थेला परवडणारे नाही. त्यामुळे युवकांनी सजग राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आजच्या गतिमान युगात प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोनातून जगण्याचा विचार करण्याची गरज आहे. आजच्या आपल्या समाजव्यवस्थेवर अंधश्रध्देचा पगडा आहे. बहुतेकजण धर्म आणि कर्मकांडात अडकलेत. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोनाअभावी समाज व्यवस्थेची प्रगती खुंटलीय. त्यामुळेच समाज व्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ दत्तात्रय वाबळे यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रा मीनाक्षी पोकळे यांनी सूत्रसंचालन तर डॉ रवींद्र भगत यांनी आभार मानले.

विद्या सहकारी बँक पुणे व संस्थेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, “शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय या परिसरातील उपक्रमशील महाविद्यालय असून, सामाजिक बांधिलकी जोपासून येथे सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. स्मृती व्याख्यानमालेत आतापर्यंत विविध मान्यवर व्यक्ती महाविद्यालयात येऊन गेल्या असून, भविष्यातही ही व्याख्यानमाला अशीच उत्तरोत्तर बहरत जाईल. या व्याख्यानमालेचे यंदाचे चौथे वर्ष असून भविष्यातही अखंडपणे ही व्याख्यानमाला सुरूच राहील तसेच बदलत्या काळात युवक व समाजाला नवे काहीतरी द्यायला हवे आणि याच उद्देशातून ही व्याख्यानमाला सुरू केली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक नवले यांनी केले. व्याख्यानमालेचे समन्वयक व इतिहास विभागप्रमुख डॉ पद्माकर गोरे यांनी प्रास्ताविक करत, व्याख्यानमालेचे महत्त्व विशद केले. व्याख्यान मालेदरम्यान सौ शोभा ढमढेरे, अनेक विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *