पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प ! – भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया

पिंपरी । प्रतिनिधी


२०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मूळ ५ हजार २९८ कोटी आणि केंद्र, राज्य शासनाच्या योजनांसह एकूण ७ हजार १२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर भर दिला आहे. तसेच, भाजपाच्या सत्ताकाळात प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांना गती दिली आहे. खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आगामी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मूळ ५ हजार २९८ कोटी आणि केंद्र, राज्य शासनाच्या योजनांसह एकूण ७ हजार १२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सर्वस्तरातील नागरिकांचा विचार करण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार लांडगे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या भाजपा सत्ताकाळात कोविड महामारीत शहरातील विकासकामांवर परिणाम झाला होता. मात्र, भाजपाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले. दरम्यान, २०१९ मध्ये राज्यातील सत्ताबदल झाला होता. त्यामुळे अडीच वर्षे भाजपा काळातील विकासकामांना गती मिळाली नाही. याउलट, अनेक कामांची तरतूद कमी करुन राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रशासक राजवट असतानाही भाजपा सत्ताकाळातील कामांना चालना मिळाली. आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासनाने सामान्य पिंपरी-चिंचवडकर केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, रस्ते, पर्यावरण, शिक्षण, क्रीडा आणि महिला सक्षमीकरणासह प्रस्तावित प्रकल्पांना पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे.
प्रतिक्रिया :
शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवडकरांचा विचार करुन सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि प्रशासनाचे आभार व्यक्त करतो. महापालिका अर्थसंकल्पाचा विचार करता भोसरी विधानसभा मतदार संघातील मोशी येथे साकारण्यात येणाऱ्या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ७५० बेडच्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यासह समाविष्ट गावांतील विविध प्रकल्पांना चालना मिळाली आहे. नदी सुधार प्रकल्पामुळे ‘नमामी इंद्रायणी’ च्या कामाला गती मिळणार आहे.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *