भाजपच्या अश्विनी जगताप यांना विजयी करून विकासपुरूष लक्ष्मण जगताप यांना वाहावी श्रद्धांजली; रामदास आठवले यांचे आंबेडकरी जनतेला आवाहन

पिंपरी, दि. २० –

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पिंपरी-चिंचवडमधील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी रिपब्लिकन पक्षाला आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नेहमीच साथ दिली आहे. त्यांनी शहरात केलेल्या विकासाचा सर्व समाजाला फायदा झाला आहे. ते विकासपुरूष होते. त्यामुळे पोटनिवडणुकीत अश्विनी लक्ष्मण जगताप यांना मताधिक्याने विजयी करून दिवंगत लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन रामदास आठवले यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आंबेडकरी जनतेला केले.

पिंपरीमध्ये झालेल्या या बैठकीला भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीचे उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, आरपीआयच्या राज्याच्या नेत्या व माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब भागवत, परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे, कुणाल वाव्हळकर, ईलाबाई ठोसर, कमल कांबळे, सुधाकर वारभुवन, सम्राट जकाते, अंकुश कानडी, रमेश चिमूरकर, सिकंदर सूर्यवंशी, अजिज शेख, सुरेश निकाळजे, बाळासाहेब रोकडे, विनोद चांदमारे, सुजित कांबळे, रुक्मिणी पाटील, बाबा सरोदे, गौतम गायकवाड, श्रीमंत शिवशरण, संजय गायकवाड, अश्विन खुडे, बाळासाहेब शिंदे, दुर्गाप्पा देवकर, बाळासाहेब काकडे, रेखा काणेकर, स्वप्नील कसबे, अविनाश शिरसाठ, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आदी उपस्थित होते.

 

चिंचवड पोटनिवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी स्वतः केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या पाठीशी उभा राहतो, तो उमेदवार शंभर टक्के विजयी होतो. त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षासोबत जोडलेल्या गेलेल्या सर्व घटकांनी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्यावी.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारे नेते होते. त्यांनी महापालिकेत सत्ता येताच मागासवर्गीय समाजातील दोन महिलांना स्थायी समितीचे अध्यक्ष केले होते. ते केवळ राजकारण करणारे नव्हते, तर समाजकारण करणारे नेते होते. त्यांनी रिपब्लिकन पक्षालाही नेहमीच मदत केली. दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी या शहरात विकासात्मक राजकारण केले. शहरात झालेल्या विकासाचा फायदा सर्वच समाज घटकांना झाला आहे. आता त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आपल्याकडून त्यांना मदत झाली पाहिजे. पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करून शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिक आणि पक्षनिष्ठ राहिलेले दिवंगत लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते व आंबेडकरी जनतेला केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *