चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक अर्ज छानणीत भाजपचे डमी उमेदवार शंकर जगताप यांच्यासह ७ अर्ज अवैध

रोहित खर्गे
विभागीय संपादक

चिंचवड- दि ८ फेब्रुवारी २०२३
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर लागलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ४० जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्या सर्व अर्जांची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आज बुधवारी (दि. ८) छाननी केली. त्यामध्ये आम आदमी पार्टी सह सात जणांचे अर्ज बाद झाले आहेत. उर्वरित ३३ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत.

निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. या मुदतीत एकूण ४० जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते.

या सर्वांच्या अर्जांचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणूक पोलीस निरीक्षक अनिल यादव, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत छाननी करण्यात आली. त्यामध्ये या ४० जणांतील भाजपाचे डमी उमेदवार शंकर जगताप, चेतन मच्छिंद्र ढोरे, गणेश सुरेश जोशी, आम आदमी पार्टीचे मनोहर नामदेव पाटील, उमेश महादेव म्हेत्रे, प्रकाश रामचंद्र बालवडकर आणि संजय भिकाडी मागाडे या सात जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. आम आदमी पार्टीचे उमेदवार मनोहर नामदेव पाटील यांनी उमेदवारी अर्ज अपूर्ण भरलेला आणि बी फॉर्मही अपूर्ण भरले होते.

डमी उमेदवार, अपूर्ण प्रतिज्ञापत्र, पुरेशा सूचकांची स्वाक्षरी नसणे, अर्ज अपूर्ण व बी फॉर्म नसणे, चिंचवड मतदारसंघातील सूचकांची नावे नसणे, तरतुदीनुसार अनामत रक्कम न भरणे या कारणांसाठी सात जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. ९ आणि १० फेब्रुवारी असे दोन दिवस अर्ज माघारीसाठी मुदत आहे. या दोन दिवसात कोणते उमेदवार माघार घेतात आणि कोण रिंगणात असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी होते की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे राहुल कलाटे यांची माघार होते की ठामपणे निवडणूक लढवनार याकडे सगळ्या शहराचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी दुपारी ३ नंतर पोटनिवडणुकीच्या मैदानातील अंतिम उमेदवार कोण असणार हे स्पष्ट होईल. जर राहुल कलाटे यांनी माघार घेतली तर दुरंगी लढत होईल. माघार नाही घेतली तर मग तिरंगी लढत होऊन या निवडणुकीमध्ये रंगत येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *