बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या समाजसेवेसाठी ट्रॅक्टर भेट : जेवणाचे ताट विष्मुक्त करण्याचा अनेकांचा निर्धार

विभागीय संपादक रवींद्र खुडे

दि. ३०/०१/२०२३

 

देशी बीज वाण जतन व संवर्धनासाठी पद्मश्री, बीजमाता राहीबाई पोपेरे यांना हिलिंग लाईव्ह संस्थेतर्फे ट्रॅक्टर भेट देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन, शनिवार दि. २८ जानेवारी २०२३ रोजी, रांजणगाव गणपती देवस्थानच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आले होते. श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती व हिलिंग लाईव्हच्या संस्थापक जानी विश्वनाथन यांच्या हस्ते हा ट्रॅक्टर राहीबाईंकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी आदर्श गाव संकल्पनेचे प्रणेते पद्मश्री पोपटराव पवार, मदर ग्लोबल फाउंडेशनच्या अध्यक्षा व स्व. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या कन्या ममता सपकाळ, मळगंगा अंध अपंग संस्थेच्या संस्थापिका जाई खामकर, कृषी उपसंचालक, पुणे भाग्यश्री पवार, श्री क्षेत्र रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओमकार देव व सचिव तुषार पाचुंदकर, मंगलमूर्ती वुमन केअर फाउंडेशनच्या संस्थापिका नारायणी फंड, पोलीस पाटील सारिकाताई पाचुंदकर, उज्वला पवार, पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर पा., प्रा. माणिक खेडकर, माजी सरपंच रामदास सांबारे, सरपंच सुप्रिया पावशे, विविध संघटनांचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभाला रांजणगाव, निमगाव भोगी, ढोकसांगवी, सोनेसांगवी, कारेगाव, भांबर्डे, शिरूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

विषमुक्त शेतीसाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याची माझी तयारी आहे, प्रत्येक गावात सीड बँक व्हावी अशी इच्छा राहीबाई पोपेरे यांनी या वेळी व्यक्त केली. हिलिंग लाईव्ह संस्थेने दिलेल्या ट्रॅक्टरमुळे, मी करीत असलेल्या देशी बियांच्या संगोपनाच्या कार्यास मला आणखी बळ मिळाले आहे असेही त्या म्हणाल्या.
उपस्थित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जैविक व सेंद्रिय शेतीचा संकल्प करतानाच, देशी बियाणे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा आणि प्रत्येक नागरिकाचे जेवणाचे ताट विषमुक्त करण्याचा निर्धार रांजणगाव महागणपतीच्या साक्षीने केला.
श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती (प्रमुख पोशिंदा संस्था) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिवरायांनी जलसंधारणाचा, राजर्षी शाहूंनी जो एकात्मतेचा विचार दिला हा पद्मश्री पोपटराव पवार, बीजमाता राहीबाई पोपेरे, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी पुढे नेत समाज समृद्धीत हातभार लावल्याचे प्रतिपादन केले. सद्यःस्थितीत पर्यावरण, आरोग्य यांच्याबरोबरच विषमुक्त शेती हा विषय देखील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे समाजाचे अस्तित्व टिकून राहील. तसेच आजारांवर कष्टातून कमावलेला पैसा खर्च करण्याची वेळ येणार नाही याबाबत प्रत्येकाने आत्मचिंतन करावे असे मौलिक विचार मांडले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष सांबारे, संतोष शेवाळे, सुनिल पडवळ, स्वप्निल फलके, विवेकानंद फंड, समीर बगाटे, विवेकानंद बढे, उषाताई वाखारे, राजेश गायकवाड, तुषार पाचुंदकर, शरद पवार, संदिप सांबारे, महागणपती देवस्थान कर्मचारी व पोलीस स्टेशन रांजणगाव एमआयडीसी यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन श्रावणी फंड व अर्चना भोर यांनी केले. निलेश माळी यांनी प्रास्ताविक व हिली लाईव्ह संस्थेच्या संस्थापिका व संस्थेच्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली. तर विवेकानंद फंड यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *