शिरूर नगर परिषदेने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग.

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. २१/०१/२०२३.

———————–

माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत, शनिवार दि. २१ जानेवारी २०२३ रोजी शिरूर नगर परिषदेने जिजामाता उद्यानात घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत एकाच वेळी हजारो शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आत्तापर्यंतचे रेकॉर्ड मोडलेय. स्वच्छ व सुंदर शिरूर उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती शिरूर नगर परिषदेच्या वतीने देण्यात आलीय. त्यापैकीच एक स्पर्धा शनिवारी घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेवेळी जिजामाता गार्डन हे पुर्णपणे विद्यार्थ्यानी भरुन गेले होते. विद्यार्थ्यामध्ये पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी व आपल्या वसुंधरा रक्षणाची जबाबदारी ही आपलीच आहे ही जाणीव निर्माण व्हावी, यासाठी शिरुर नगरपरिषदच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


शिरुर नगर परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसह शहरातील सुमारे १५ शाळांतील ६००० हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाल्याचे मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर यांनी सांगितले .
स्पर्धेमध्ये इयत्ता १ ली ते २ री च्या विद्यार्थ्याच्या साठी रंगभरण स्पर्धा होती. इयत्ता ३ री ते चौथी या गटासाठी ‘ओला व सुका कचरा वर्गीकरण ‘ व ‘निसर्गदेखावा’ हे विषय होते. इयत्ता सहावी ते सातवी गटासाठी ‘माझी वसुंधरा’ व ‘स्वच्छ व सुंदर शिरुर’ हा विषय होता. इयत्ता आठवी ते दहावी गटाकरिता ‘कोरोना काळातील भारत’ व ‘प्लॅस्टिक एक समस्या’ हे विषय होते.


प्रत्येक गटात तीन विजेते काढण्यात येणार असुन, स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्याना बिस्किट पुडे व चॉकलेटचे वाटप पालिकेच्या वतीने करण्यात आले. लहान मुलांमार्फत पर्यावरण व माझी वसुंधरा बाबत जनजागृती करण्याबरोबरच निसर्ग संवर्धन व स्वच्छतेविषयी गोडी निर्माण व्हावी या हेतुने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे तसेच ‘माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढण्यासाठी विविध उपक्रम शिरुर नगरपरिषद राबवित असल्याचे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले. त्यासाठी शहरातुन रॅलीही काढण्यात आली होती.
चित्रकला स्पर्धेवेळी शिरुर नगरपरिषद स्वच्छता विभागाचे निरीक्षक दत्तात्रेय बर्गे, रामचंद्र नरवडे, राजश्री मोरे, मुंबई येथील एसएनडीटी महाविद्यालयातील समाजकार्य विषयाच्या विद्यार्थिनी सह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते .
स्पर्धेत विद्याधाम प्रशाला, रयत शाळा, डेक्कन सोसायटी इग्लिश मिडियम स्कुल, विजयमाला इंग्लिश स्कुल, बालाजी इंग्लिश स्कुल, रसिकलाल माणिकचंद धारीवाल स्कुल, साधना इंटरनॅशनल स्कुल, ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल, जीवन विकास मंदिर शाळा, उर्दु स्कुल शिरुर, तसेच नगरपरिषदच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.


दरम्यान मनसेचे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष ॲड स्वप्नील माळवे यांना काही पालकांनी तक्रारी करून स्पर्धेदरम्यान अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले. लहान विद्यार्थ्यांना बागेतील ज्या लॉनवर बसविले होते, ती लॉन ओली असल्याने मुलांना थंडीचा त्रास झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. सर्वच विद्यार्थ्यांना कंपल्शन करायला नको होते अशाही तक्रारी होत्या.
तक्रारीनंतर मात्र उशिरा का होईना म्याट अंथरण्यात आले होते. त्यामुळे जेवढी चांगली कामे करण्याचा प्रयत्न होतोय, तेवढ्याच उणिवाही समोर येऊ लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *