दि. १८/०१/२०२२
पिंपरी
पिंपरी : पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड या विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २७ फ़ेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. निवडणूक आयोगाने आज बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार २७ फ़ेब्रुवारी रोजी लक्षद्वीप, अरुणाचल प्रदेश, झारखंड, तामीळनाडू, पश्चिम बंगाल येथील प्रत्येकी एका जागेसह महाराष्ट्रातील कसबा आणि चिंचवड या दोन जागा अशा मिळून एकूण ७ जागांवर २७ फ़ेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार ३१ जानेवारी रोजी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल. ७ फ़ेब्रुवारी ही नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतीम तारीख असणार आहे. ८ फ़ेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाईल. १० फ़ेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. २७ फ़ेब्रुवारी रोजी मतदान होईल. २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.