‘सुदैवाने वाचलो; नाहीतर आजच श्रद्धांजलीचा कार्यक्रम घ्यावा लागला असता!’ : अजित पवार

दि. १६/०१/२०२३
पिंपरी
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सांगितला त्यांच्यावर ओढावलेला प्रसंग
 
पिंपरी : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार शनिवारी एका गंभीर अपघातातून बचावले आहेत पुण्यातील एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी ते गेले असता ज्या लिफ्ट मधून ते चौथ्या मजल्यावर जात होते ती लिफ्ट वीज पुरवठा खंडित झाल्याने थेट खाली येऊन आदळली. सुदैवाने या दुर्घटनेत अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेले एक वयोवृद्ध डॉक्टर यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र, दरवाजा तोडून लिफ्टमधून त्याना बाहेर काढावे लागले.
 
रविवारी बारामती दौऱ्यावर असताना स्वत: अजित पवार यांनी ही माहिती एका कार्यक्रमात आपल्या कार्यकर्त्यांना दिली.

सुदैवाने आम्ही वाचलो नाहीतर…
या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, मी शनिवारी एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी गेलो होतो. त्यावेळी तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर लिफ्टने जात असताना अचानक लाईट गेली. त्यामुळे चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट थेट खाली आली. त्यावेळी माझ्यासोबत एक डॉक्टर आणि एक सुरक्षा रक्षक होते. यानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून आम्हाला बाहेर काढण्यात आले. काल माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. त्यामुळं घरात कोणाला काही सांगितलं नाही. माध्यमांना देखील याची माहिती होऊ दिली नाही. आपण आपली काळजी घेतली पाहिजे. तुमच्या आशीर्वादामुळे मला काही झालं नाही. या अपघातानंतर काही न झाल्या सारखं दाखवून मी भाषण करुन घरी आलो. सुदैवाने आम्ही वाचलो नाहीतर आजच श्रद्धांजलीचा कार्यक्रम घ्यावा लागला असता, असे अजित पवार यांनी सांगितले. शनिवारी दिवसभर मी हे कोणालाच सांगितले नाही. मात्र, आज तुम्ही माझ्या घरचे आहात म्हणून तुम्हाला सांगतो, असेही अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *