निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात कुणीच उरणार नाही ?

दि. १६/०१/२०२३
पिंपरी

 

पिंपरी : ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील तू तू-मैं मैं काही केल्या संपत नाही. अशातच निवडणुकीपूर्वी ठाकरे यांचा पक्ष हा रिकामा झाल्याचे पाहायला मिळेल, असा गौप्यस्फोट शिंदे गटाच्या एका खासदाराने केला आहे.

प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत निवडणुकांपूर्वी ठाकरे गटात राहिलेले आमदार आणि खासदार शिंदे गटात येतील, आणि ठाकरे यांचा पक्ष रिकामा होईल,असा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली. तर शरद पवार यांच्या इशाऱ्यावर संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे, असा खळबळजनक आरोप प्रतापराव जाधव यांनी केला आहे. इतकच नाही तर त्यांनी ठाकरे गटाचा उल्लेख शिल्लक सेना असा करत ठाकरे गटाला डिवचलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली. मोठ्या प्रमाणात नेते, पदाधिकारी शिंदेगटात प्रवेश करत आहेत.राजन साळवी, वैभव नाईक व आता उद्धव ठाकरे गटाचे तिसरे आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवार आले आहेत. त्यांना संपत्तीच्या चौकशीसाठी एसीबीने नोटीस पाठवली आहे.

या नोटीसीमध्ये देशमुख यांना 17 जानेवारी रोजी अमरावती परिक्षेत्र कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी एसीबीकडून राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना एसीबीने नोटीस पाठवली होती. एसीबीची नोटीस आलेले नितीन देशमुख ठाकरे गटाचे तिसरे आमदार आहेत. एकापाठोपाठ एका आमदाराला तपास यंत्रणा नोटीस पाठवत असल्याने ठाकरे गटात खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *