पत्रकारांमुळेच लोकशाही टिकून : तहसीलदार शिरूर, प्रशांत पिसाळ

दि.०९/०१/२०२३
रवींद्र खुडे : विभागीय संपादक
शिरूर


शिरूर : पत्रकार फक्त लेखणीपुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रम राबवत आहेत. समाजात अनेक पत्रकार बांधव तसेच त्यांच्या संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवुन समाजोपयोगी कामे करत असल्याने, त्यांचे हे काम खुप कौतुकास्पद असल्याचे शिरूरचे तहसिलदार प्रशांत पिसाळ यांनी गोकुळ वृध्दाश्रम येथे कार्यक्रमात बोलताना सांगितले.

शिरूर येथील बोऱ्हाडे मळा येथे असणाऱ्या गोकुळ वृद्धाश्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शिरूर यांच्या वतीने, पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास शिरूरचे प्रभारी तहसीलदार प्रशांत पिसाळ, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व वृद्धाश्रमाचे संचालक बेदमुथा परिवार उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस तहसिलदार प्रशांत पिसाळ व पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पत्रकार संघाच्या वतीने वृध्दाश्रमास अन्न-धान्य, किराणा व फळे देण्यात आली.

वृद्धाश्रमाचे मालक गोकुळ बेदमुथा व परिवाराने सर्व पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, पुष्प व गळ्यात मण्यांची माला घालून स्वागत केले. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “माझा जन्म बीड जिल्ह्यातील अंमळनेर या छोट्याशा गावात झाला. गरिबीमुळे आम्ही १९५३ साली शिरूर येथे स्थलांतरित झालो. येथे बाफना यांच्याकडे ६० रू. पगारावर काम करून कुटुंब सांभाळत पुढे व्यवसाय सुरू केला. जशी परिस्थिती सुधारू लागली तसे आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजासाठी खर्च करू लागलो. आमच्या वडिलांना अर्धांगवायू झाला. त्यांनी वृध्दाश्रम सुरू करण्याची कल्पना मांडली. त्यामुळे मी वृध्दाश्रम सुरू केला. याला अनुदान नाही. परंतु आमच्या कुटुंबाच्या व वृद्धाश्रमावर प्रेम असणाऱ्या लोकांमुळे हे कार्य अविरत चालू आहे. खरे तर याची कॅपॅसिटी ४० जणांची आहे. परंतु सध्या येथे १२ लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. मी एक योजना सुरू केलीय. ११००० रू. देणाऱ्या दात्याच्या नावाने वर्षातील एक दिवस अन्नदानासाठी फिक्स केला जातो व त्याच्या नावाने तहहयात मोफत जेवण उपलब्ध करून दिले जातेय. आत्तापर्यंत १०९ दिवस फिक्स झाले असून, त्यातून जमा झालेली सर्व रक्कम बँकेत ठेवली असून त्याच्या व्याजावर ही स्कीम चालू आहे. आता वर्षाच्या एकूण ३६५ दिवसांपैकी उरलेल्या दिवसांसाठीही दात्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.”

तहसीलदार पिसाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “गोकुळशेठ मुथा हे वयाच्या ऐंशीव्या वर्षीही खूप ठणठणीत आहेत व त्यांच्या नावाने वृध्दाश्रम चालू आहे. त्यांचे वडील खिंवसरा मुथा यांनी वृध्दाश्रम सुरू करण्यास सांगितले आणि त्याप्रमाणे गोकुळशेठ यांनीही तो सुरू करत आज सतत २२-२३ वर्ष चालू ठेवलाय. त्यांची पुढची पिढीही यात सक्रीय दिसते आहे. जर शासकीय योजना येथील लाभार्थ्यांना देता येत असतील तर तसाही विचार करता येईल. पत्रकार बांधवांनीही अशा स्तुत्य कार्यास प्रेरणा देत राहावी. मला एका चांगल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. मी पुन्हा येथे भेट देईन” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पोलीस निरीक्षक राऊत यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की, “खरे तर वृध्दाश्रम नसावेत असेच मला व प्रत्येक सुजाण नागरिकाला वाटत असते. परंतु नाईलाजास्तव ते सुरू करावे लागतात. कारण, ती देखील एक काळाची गरज बनलेली आहे. आणि असे वृध्दाश्रम चालु करण्यात जैन व व्यापारी बांधवांचे खूप मोठे योगदान सर्वत्र दिसून येते. त्यांच्यामुळे काही निराधार लोकांना आधार मिळतो. इतर लोकांनीही असे कार्य करावे असे मला वाटतेय. कोरोना काळात मी देखील याठिकाणी येऊन, येथील व्यवस्थेची पाहणी केली होती व फळे देखील वाटली होती.”

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अर्जुन बढे, शहराध्यक्ष बबन वाघमारे, सचिव भाऊसाहेब खपके, उपाध्यक्ष सुनील पिंगळे, योगेश भाकरे, प्रसिध्दी प्रमुख आकाश भोरडे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी पत्रकार रविंद्र खुडे, भगवान श्रीमंदिलकर, वृक्षमित्र तुषार वेताळ, सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे, गोकुळ मुथा, कांचन मुथा, धन्यकुमार मुथा, आसराज मुथा, पारस मुथा यांसह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्जुन बढे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पारस मुथा यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *