वकिलाचा खून करणारे अटकेत ; गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

दि. ०६/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : काळेवाडी येथील वकील शिवशंकर शिंदे यांचे ३१ डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या कार्यालयातून अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर आढळला होता. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने मोठ्या कौशल्याने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

राजेश्वर गणपत जाधव (वय ४२), सतीश माणिकराव इंगळे (वय २७). बालाजी मारुती एलनवर (वय २४, सर्व रा. भक्तापूर, देंगलूर, नांदेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अनैतिक संबंधांच्या संशयावरून पिंपरी-चिंचवड शहरातील वकिलाचे अपहरण करून खून केला. महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर मृतदेह जाळून आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अपहरणासाठी वापरलेल्या टेम्पोवरून आरोपी निष्पन्न करून पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. पोलिसांना शिवशंकर शिंदे यांच्या ऑफिसमध्ये रक्ताचा ठिपका व शर्टची तुटलेली दोन बटणं मिळाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीचा टेम्पो दिसून आला. त्यावरून माग काढून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या, वकिलाचा खून केल्याची आरोपींनी पोलिसांकडे कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर शिंदे यांचे विजयनगर, काळेवाडी येथील त्यांच्या कार्यालयातून ३१ डिसेंबरला अपहरण झाले. त्याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. घातपाताची शक्यता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दरम्यान, शिंदे यांच्या वर्णनाच्या व्यक्तीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत तेलंगणा राज्यातील महाराष्ट्र सीमेवर आढळला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकांनी तेलंगणा येथे धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर, श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने, पोलिस कर्मचारी हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाधर चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभिरे, सुनील चौधरी, मयूर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, राम मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी व तौसिफ शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *