रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद

रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद

दि. ०५/०१/२०२३
पुणे


पुणे : पुणे सोलापूर महामार्गावरील यवत ग्रामपंचायतीच्या हद्दीत रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. टोळीकडून पोलिसांनी तीन मालवाहतूक टेम्पो व धान्य असा १२ लाख ७३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुकेश नरसिंगराव माधव (वय – २१ रा. बिबेवाडी वोटा नं १०९, सुहाग मंगल कार्यालय ता. हवेली), भाऊसाहेब अर्जुन कुटे वय ३७, रा. नाईस प्लॉट, कॅनॉल जवळ चारभुजा सायकल मार्टचे पाठीमागे, गुलटेकडी ता. हवेली), सादिक इलाहीबक्ष अलबेलकर वय ५५, रा. काशीवाडी, भवानी पेठ ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन धान्याची काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन घाडगे यांना मिळाली होती. त्यानुसार दौंडचे पुरवठा अधिकारी व यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना कळविण्यात आले त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कासुर्डी टोलनाका येथे सापळा रचला.

यावेळी पुण्याच्या दिशेने जाणारे तीन टेम्पो पकडण्यात आले. गाड्यांच्या चालकांना गाडीत असलेल्या मालासंबंधी विचारणा केली असता त्यांनी गाडीत गहू, तांदूळ, हरभरा असल्याचे सांगितले. यावेळी अधिक चौकशी केली असता चालकांकडे मालाशी संबंधित कोणतीच कागपत्रे नव्हती.

पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी जावेद लालू शेख, कासिम शेख व अमोल कंधारे, अब्बास अब्दुल सरकार (रा. तिघेही काशेवाडी, पुणे) यांचा माल असल्याची कबुली दिली. हा माल केडगाव येथील दुकानदाराकडे घेऊन जाणार असल्याची कबुली वाहनचालकांनी दिली. धान्याची पडताळणी केली असता ते रेशनिंगचेच असल्याची खात्री झाली. त्यामुळे पंचांना बोलावून पंचनामा करण्यात आला. या तीनही वाहनांत मिळून १० हजार ८०० किलो रेशनिंगचे तांदूळ, ३०० किलो गहू, २५ किलो हरबरा असे रेशनिंगचे धान्य मिळून आले. अटक कारण्यात्त आलेल्यांकडून पोलिसांनी तीन मालवाहतूक टेम्पो व धान्य असा १२ लाख ७३ हजार २५० रुपयांचा मुदेमाल जप्त केला आहे.

हि कारवाई पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलिस हवालदार सचिन घाडगे, असिफ शेख, अजित भुजबळ, विजय कांचन, अजय घुले, धिरज जाधव यांच्या पथकाने केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *