चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

दि. ०३/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचे आज मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मागील वर्षभरापासून ते आजारी होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील वजनदार नेते म्हणून जगताप यांची ओळख होती. स्थानिक राजकारणात त्यांचा विशेष दबदबा होता. शहराचे राजकारण केवळ बोटाच्या इशाऱ्यावर फिरविण्याची ताकद असलेले नेते म्हणून ते ओळखले जात होते. त्यांनी पिंपरी महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक म्हणून काम केले. सन 2000 मध्ये ते शहराचे महापौर होते. सन 2004 मध्ये पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष निवडून येत त्यांनी विधानपरिषदेत प्रतिनिधीत्व केले. 2009 मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि पहिल्याच निवडणुकीत लक्ष्मण जगताप अपक्ष निवडून आले. दरम्यान 2014 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), मनसेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविली. पण, त्यात त्यांचा पराभव झाला.

लक्ष्मण जगताप हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. पण, 2014 मध्ये त्यांनी पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडमधून भाजपच्या चिन्हावर ते निवडून आले. शहरातील भाजपचे ते पहिले आमदार होते. 2019 च्या निवडणुकीतही भाजपकडून निवडून येत ते चौथ्यांदा आमदार झाले.

2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का देत महापालिका भाजपकडे खेचून आणण्यात जगताप यांची मोठी भूमिका होती.

आमदार लक्ष्मण जगताप यांचे पार्थिव  दु. 3 ते 6 या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यविधी सायंकाळी ७ वाजता पिंपळे गुरव येथे होणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *