आम्हाला काय देणं-घेणं आहे त्याचं; एकनाथ शिंदेंच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर

३० डिसेंबर २०२२

नागपुर


हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना जोरदार हल्लाबोल केला. तसेच, उद्धव ठाकरेंच्या काही विधानाचा संदर्भही यावेळी एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिला. यावरून अजित पवार चांगलेच संतप्त झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला प्रत्युत्तर दिलं.

राज्याच्या कुठल्याही विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकांसाठी महत्त्वाचा असतो. त्याला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उत्तर देतात. सहा महिन्यांपूर्वी काय झालं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याला आज सहा महिने झाले. मीही सभागृहात ३२ वर्ष झाली आलोय. त्याआधीही मी इतरांची भाषणं ऐकायचो. शरद पवारांनीही ७८ साली पुलोद स्थापन केलं होतं. तेव्हा अनेक मान्यवर त्या मंत्रीमंडळात होते. पण कधीही मुख्यमंत्र्यांची भाषणं ही राजकीय होत नाहीत. एखाद-दुसरा चिमटा काढला, मी समजू शकतो असं अजित पवार म्हणाले.

बाहेर तुम्ही ज्यांना सोडून आलात, त्यांच्या वृत्तपत्रात काही बातम्या येणार. ते तुम्ही मनाला लावून घेणार. ते तुम्ही इथे सांगणार. आम्हाला काय देणं-घेणं आहे त्याचं. यशवंतराव चव्हाणांची शिकवण बघा. आचार्य अत्रे त्यांच्यावर किती टीका करायचे. तरी ते दिलदारपणे घ्यायचे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही त्यातून बाहेर या. तुम्हाला बहुमत मिळालंय. या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री झाले आहात. असल्या छोट्या गोष्टीत तुम्ही तुमचं मन जास्त रमवू नका. हे राज्यातल्या जनतेला अजिबात आवडणार नाही.

तरुणांना वाटतंय मला काम कसं मिळणार आहे. महागाई कशी कमी होणार आहे. शेतकऱ्यांबाबत काय भूमिका घेतली जाणार आहे यात रस आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करत आहात. जाऊ द्या ना, मुलं आहेत म्हणून सोडून द्या ना. दुसऱ्या कार्यकर्त्यांना प्रवक्ते म्हणून बोलू द्या ना. तुमचे नरेंद्र मोदींशी, अमित शाहा यांच्याशी चांगले संबंध झालेत. तिथून राज्यासाठी अजून काय चांगलं आणता येईल हे बघा. राज्याच्या हितासाठी दिल्लीत जा. पण तुम्ही त्यावर बोलत नाहीयेत, असंही अजित पवार म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *