अडीच वर्ष घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

३० डिसेंबर २०२२

नागपुर


हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत असताना उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

आम्ही अनेक चांगल्या गोष्टी केल्या त्याचं कौतुक विरोधकांनी करायला हवं होतं. पण तसं झालं नाही. आज करोना जपान आणि चीनमध्ये आहे. मी खरंच सांगतो सरकार बदललं नसतं तर इथे अधिवेशन झालंच नसतं. अजित पवारही या गोष्टीला नकार देणार नाहीत. गेल्या अडीच वर्षात करोनाच्या स्थितीत राज्य नैराश्याच्या गर्तेत गेलं होतं. आम्ही आल्यानंतर राज्याला चालना देण्याचं काम केलं आहे. शेतकऱ्यांना काय पाहिजे आम्हाला कळलं आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. कधीही त्याला काही मागायची गरज लागली नाही.

हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रूपये मिळवा असा टोमणा मला मारण्यात आला होता. मग मी म्हणतो अडीच वर्ष घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा. लोकांचं हे बक्षीस वाचावं म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला, सरकारच बदललं.अजितदादा तुम्ही काल म्हणालात की मी चुकलो. त्यानंतर तुम्ही आत्मक्लेश केला. जो माणूस चूक सुधारतो तो आत्मक्लेश करतो. मात्र काही लोक चुकले तरी आम्हीच बरोबर म्हणतो. एक माणूस चुकतो, दोन चुकतात, पाच चुकतात, दहा चुकू शकतात.. पण ५० जण? तरीही एक माणूस म्हणतो ते पन्नास लोक चुकीचे आणि मीच बरोबर असं कसं होऊ शकतं? अजितदादा हे मी तुम्हाला बोलत नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

ज्या प्रबोधनकारांनी अनिष्ट प्रथांना कायम विरोध केला, त्याच प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबांची भाषा करायला लागले? मला आठवतंय आम्ही वर्षावर नंतर गेलो आधी काय काय आहे ते बघा म्हटलं. आम्हाला पाटीभर लिंबं सापडली तिकडे. लिंबूटिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांच्याच नाही तर प्रबोधनकारांच्या विचारांनाही तिलांजली दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *