छत्रपतींच्या नावाचा वापर राजकारणासाठी केला जातो हे दुर्दैव : विश्वास पाटील

दि .३०/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या थोर महापुरुषांचा नावाचा वापर राजकारणासाठी केला जातो हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व एका जाती धर्मापुरते मर्यादित नाही ते विश्वव्यापी व्यक्तिमत्व आहे. त्यांना एका चित्रपट, एक मालिका, कादंबरी एवढ्या पुरते सामावून घेता येणार नाही. छत्रपती शिवाजी राजे यांचे वडील शहाजीराजे यांचा देखील इतिहास समजून घेतला पाहिजे. मी शासकीय सेवेत असताना तात्कालीन केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांना व्हिएतनाम येथून शिष्टमंडळ भेटण्यास आले होते. या शिष्टमंडळास अनेक पर्यटन स्थळ दाखवण्यात आली. रात्री या शिष्टमंडळाने आम्हाला प्रश्न विचारला की, रायगड कोठे आहे ? म्हणजे ज्या दिग्गज अमेरिकेला अनेक वर्ष लढून छोट्याशा व्हिएतनाम देशाने युद्धामध्ये नमवले त्या देशातील नागरिकांना रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आहे. अमेरिका व्हिएतनामचे युद्ध हेच मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास करून व्हिएतनामने जिंकले हा इतिहास आहे. आज भारतातील लाखो लोक पर्यटनासाठी दरवर्षी परदेशात जातात परंतु यातील किती लोकांनी रायगडाला भेट दिली हे पहावे लागेल. वीस, पंचवीस वर्षांपूर्वी रायगडावर शाबीर शेख आणि निवडकच पुढारी येत होते आता सर्व नेते राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात असे परखड मत ज्येष्ठ कादंबरीकार व निवृत्त सनदी अधिकारी विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

इंद्रायणी साहित्य परिषद आणि मोशी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या समारोप्रसंगी विश्वास पाटील यांची भानुदास तापकीर यांनी प्रकट मुलाखत घेतली. मोशी येथील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी, रवींद्रनाथ टागोर विचारपीठावर यावेळी
संमेलनाचे अध्यक्ष कामगार नेते व माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, स्वागत अध्यक्ष संतोष बारणे तसेच कार्यकारीनी मंडळाचे अध्यक्ष संदीप तापकीर, इंद्रायणी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सीमा काळभोर, विकास कंद, सचिव रामभाऊ सासवडे, सहसचिव डॉ. ए. ए. मुलानी, कोषाध्यक्ष अलंकार हिंगे, सदस्य दादाभाऊ गावडे, श्रीहरी तापकीर, सुनील जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी तापकीर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर विश्वास पाटील यांनी उत्तर देताना सांगितले की, “पानिपत” या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे अपेक्षित होते. त्यामुळे सलग तीन वर्ष साहित्य अकादमीकडे शिफारस केली जायची. परंतु लेखकाचे वय कमी असल्यामुळे त्यावेळी मला पुरस्कार नाकारण्यात आला. नंतर “झाडाझडती” कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर वयाच्या ३२ व्या वर्षी मला साहित्य अकादमी पारितोषिक मिळाले. या कादंबरीचे प्रकाशन इंदिरा गोस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. आसाम मधील सामान्यांचे प्रश्न, तेथील प्रकल्पग्रस्तांचे ज्वलंत प्रश्न यात मांडले आहेत. पानिपत मुळे समाजामध्ये इतिहासाविषयी जागृती झाली असे मला वाटते. पानिपत प्रसिद्ध झाल्यानंतर आता दरवर्षी १४ जानेवारीला लाखो लोक त्या स्थळावर अभिवादन करण्यासाठी जमतात हा एका लेखणीचा विजय आहे असे मला वाटते. वाण्यांच्या चाळीतील मी सामान्य युवक ते मुंबई उपनगराचा जिल्हाधिकारी हा प्रवास मी “लस्ट टू लालबाग” ( Lust to Lalbag) या कादंबरीत मांडला आहे. “नागकेशर” ही तीस वर्षे मनात ठेवलेल्या जिवंत विषयाची कादंबरी आहे. तर “पांगिरा” या कादंबरीत शेतकऱ्यांनी केलेल्या कांदा विषयावरील आंदोलन त्यांचे प्रश्न यात मांडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर कादंबरी लिहिताना अनेक किल्ले फिरलो मी फिरलो. “चंद्रमुखी” कादंबरी वर चित्रपट निघू नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. या चित्रपटानंतर माझं नाव झालं, पण अनेक पुढारी त्या पात्रात स्वतःला शोधत असल्यामुळे ते माझ्यावर नाराज झाले. एखादा विषय, इतिहास, घटना, प्रसंग, ऐतिहासिक स्थळ यावर जर लिहायचे असेल तर प्रत्यक्ष त्या स्थळाला भेट दिली पाहिजे. तिथला निसर्ग, तिथली सद्य परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली पाहिजे. तरच तुम्हाला ते शब्दात मांडता येईल असा सल्ला त्यांनी इतर नवलेखकांना यावेळी दिला.

स्वागताध्यक्ष संतोष बारणे यांनी स्वागत केले. आभार कार्यकारणी मंडळाचे कार्यध्यक्ष सोपान खुडे यांनी मानले. पसायदानाने संमेलनाचा समारोप करण्यात आला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *