पुढच्या अधिवेशनात कोण राहतंय, कोण जातंय माहिती नाही. ही कुठली पद्धत झाली? – अजित पवार

३० डिसेंबर २०२२

नागपूर


विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं होत आहे. आज विधानसभा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. विधानसभेत आज सदस्यांकडून आलेल्या लक्षवेधी सूचनांवर चर्चा सुरू असताना अजित पवार संतप्त झाले.

चार क्रमांकाच्या लक्षवेधीवर चर्चा झाल्यानंतर पुढे आमदार वैभव नाईक यांनी मांडलेल्या पाच क्रमांकाच्या लक्षवेधीवर चर्चा होणं अपेक्षित होतं. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून या लक्षवेधीवर उत्तर अपेक्षित होतं. मात्र, गिरीश महाजन सभागृहात उपस्थित नसल्यामुळे तालिका अध्यक्षांनी पाच क्रमांकाची लक्षवेधी पुढे ढकलून सहाव्या क्रमांकाची लक्षवेधी पुकारली. यावरून अजित पवार संतप्त झाले.

पाच नंबरची लक्षवेधी पुढे का ढकलली? वैभव नाईक इथे बसले आहेत. किती दिवस ती पुढे ढकलताय? आम्हीही मंत्री होतो. आम्ही काय इथे एकदम येऊन बसलो नाहीये. मंत्र्याचं काम आहे इथे यायचं. जर मंत्री नाही आले, तर त्यांना जाब कोण विचारणार? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. एक वेळ आम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं समजू शकतो. त्यांना जास्तीची कामं असतात. दुसरे लोक उत्तरं देतात. आम्ही मान्य केलंय. पण गिरीश महाजन का नाही आले सभागृहात. सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात घेऊ. पुढच्या अधिवेशनात कोण राहतंय, कोण जातंय माहिती नाही. ही कुठली पद्धत झाली? तुम्हीही कुणी यावर काही बोलत नाही. सगळ्यांचे लाड चाललेत लाड, अशा शब्दांत अजित पवारांनी सरकारला सुनावलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *