महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेंतर्गत कबड्डी स्पर्धेचे बारामती येथे आयोजन

दि. २९/१२/२०२२
पुणे


पुणे : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांअंतर्गत कबड्डी स्पर्धेचे आयोजन ५ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय बारामती येथे करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, बारामती नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, महाराष्ट्र राज्य कबड्डी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन ऑलिम्पिक स्पर्धांच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातून खेळाडू सहभागी होणार असून त्यांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन द्यावात. राज्यभरातून क्रीडा ज्योत मशाल पुणे शहरात एकत्र आणण्यात येणार असून त्यांनतर त्या सर्व क्रीडा ज्योत एकत्रितस्वरुपात पुणे येथून शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे नेण्यात येणार आहे. पुणे विभागातील क्रीडा ज्योत बारामतीहून पुणे येथे येणार आहे. त्यामुळे क्रीडा ज्योत रॅलीच्या अनुषंगाने व्यवस्था करावी. मार्गावरील शाळेतील खेळाडूंना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे. या क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या स्पर्धेत राज्यातील नामंवत खेळाडू सहभागी होणार असून या स्पर्धा पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन यावे. स्पर्धेच्या निमित्ताने बारामती शहरातील नागरिकांना राज्यातील नामवंत खेळाडूंचे खेळ पाहण्याची संधी मिळणार असल्याने स्थानिक शाळांना सहभागी करून घ्यावे असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

या स्पर्धेत राज्यातील पुरुष व महिला गटात प्रत्येकी ८ वरिष्ठ संघ सहभागी होणार आहेत. खेळाडूंसोबत संघव्यवस्थापक, मार्गदर्शक, तांत्रिक अधिकारी व स्वयंसेवक आदी सुमारे ३०० व्यक्ती सहभागी होणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *