अधिवेशनात विरोधकांच्या अनुपस्थितीत चर्चेशिवाय लोकायुक्त विधेयक मंजूर

२८ डिसेंबर २०२२

नागपुर


नागपूरमधील महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी विधानसभेत महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आलं. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरील घोटाळ्याच्या आरोपावरून सभात्याग केला. यावेळी विरोधकांच्या अनुपस्थितीत चर्चेशिवाय हे विधेयक मंजूर करण्यात आलं.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विधेयकावर सरकारची बाजू मांडली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, या सभागृहाचे मी आभार मानतो की, या सभागृहाने लोकायुक्त विधेयक एकमताने मंजूर केलं. खरंतर समोरच्या बाकावरचे लोक उपस्थित राहिले असते तर अधिक आनंद झाला असता. आम्ही या विधेयकावर विरोधकांशीही चर्चा केली होती. त्यामुळे असते तर या विधेयकावरचं एकमत आणखी व्यवस्थित दाखवता आले असते. या निमित्ताने मला निदर्शनास आणून द्यायचे आहे की, केंद्र सरकारने लोकपाल कायदा आणल्यानंतर देशातील राज्यांनी त्याचधर्तीवर लोकायुक्त कायदा मंजूर करावा असं अपेक्षित होतं. त्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण केलं होतं. तेव्हा मी आणि गिरीश महाजन आम्ही स्वतः अण्णा हजारेंकडे गेलो होतो आणि त्यांना आश्वासित केलं होतं की, अशाप्रकारचा तुम्हाला अपेक्षित लोकायुक्त कायदा महाराष्ट्र सरकार तयार करेल,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.

हा कायदा करताना आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे, अशी मागणी अण्णा हजारेंनी केली होती. त्यामुळे सरकारने उच्चस्तरीय समिती तयार केली. त्या समितीत अण्णा हजारे आणि त्यांनी सुचवलेले प्रतिनिधी होते. सातत्याने तो मसुदा अंतिम करण्यासाठी बैठका झाल्या. तसेच त्या समितीने जे बदल सुचवले ते सर्व बदल आपण मान्य केले असंही फडणवीसांनी नमूद केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *