डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बसविणार वायू गुणवत्ता दर्शक फलक

 

दि. २८/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : हवेतील प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच हवेची दैनंदिन प्रदूषण पातळी तपासण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि परिसर संरक्षण संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे फुफ्फुसाचे बिलबोर्ड (वायू गुणवत्ता दर्शक फलक) बसविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली.

महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत शहरातील पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने शहरातील हवेच्या दैनंदिन स्थितीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून पर्यावरणाचे संरक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

दि.६ जानेवारी २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२३ या कावधीत, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे फुफ्फुसाचे बिलबोर्ड बसविण्यात येणार आहे. बिलबोर्डावर हवेच्या दैनंदिन गुणवत्तेविषयी आकडेवारी दर्शविण्यात येणार आहे. शहरातील महापालिकेच्या व खाजगी शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, विविध सामजिक व अशासकीय संस्थांना या ठिकाणी आमंत्रित करून हवेतील प्रदूषणाच्या स्थितीबद्दल मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.

महापालिकेच्या उद्यान विभाग, विद्युत विभाग, सुरक्षा विभाग, माहिती व जनता संपर्क विभाग, वाहतूक शाखा, पिंपरी आणि परिसर संरक्षण संवर्धन संस्था यांच्या समन्वयाने फुफ्फुसाचे बिलबोर्ड बसविण्यात येणार असून बिलबोर्डवर दर्शविण्यात येणाऱ्या हवेतील दैनंदिन स्थितीच्या आकडेवारीची नोंद देखील महापालिकेमार्फत घेण्यात येणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *