राजकारण्यांना अभिनय आला पाहिजे, सध्याचे पुढारी गहिवरण्याचे नाटक करतात : उल्हासदादा पवार

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२८ डिसेंबर २०२२

पिंपरी


एखाद्या वादामध्ये चांगल्या शब्दांची पेरणी केली तर त्या वादाचे देखील सौंदर्य वाढते. माझे गुरु बाळासाहेब भारदे नेहमी म्हणायचे वाद नको, वादाला संवादाची साथ द्या, त्यातून परिसंवाद घडवा आणि वितंडवाद वर विजय मिळवा. आत्ताचे पुढारी मात्र एकमेकांची लक्तरे काढण्यातच मोठेपण मानत आहेत. राजकारण्यांना अभिनय आला पाहिजे पण अलीकडे गहिवरण्याचे नाटक करणारे पुढारी आपण पाहत आहोत अशी मार्मिक टिपणी माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी केली. इंद्रायणी साहित्य परिषद आणि मोशी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या इंद्रायणी साहित्य संमेलनात माजी आमदार उल्हासदादा पवार यांची प्रकट मुलाखत नाना शिवले यांनी घेतली. यावेळी पवार यांनी राजकारण, जातीयवाद, वारकरी संप्रदाय, राजकारणी नेत्यांचे मोठेपण व सध्याची राजकीय परिस्थिती अशा विविध विषयांवर आपले परखड मत व्यक्त केले.

मोशी येथील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी, रवींद्रनाथ टागोर विचारपीठावर यावेळी संमेलनाचे अध्यक्ष कामगार नेते व माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, पद्मश्री गिरीश प्रभुणे,स्वागत अध्यक्ष संतोष बारणे, विश्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी, संवेदना प्रकाशाचे नितीन हिरवे, कार्यकारीनी मंडळाचे अध्यक्ष संदीप तापकीर, इंद्रायणी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सीमा काळभोर, विकास कंद, सचिव रामभाऊ सासवडे, सहसचिव डॉ. ए. ए. मुलानी, कोषाध्यक्ष अलंकार हिंगे, सदस्य दादाभाऊ गावडे, श्रीहरी तापकीर, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी उल्हास पवार यांच्या हस्ते संमेलनाचे अध्यक्ष अरुण बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या “अक्षर प्रतिभेतील प्रज्ञावंत” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मोशी येथे पहिल्या इंद्रायणी साहित्य संमेलनात उल्हास दादा पवार यांची प्रकट मुलाखत

यावेळी उल्हास दादा पवार यांनी सांगितले की, श्री संत ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव यांना तत्कालीन परिस्थितीत त्रास देणाऱ्या प्रवृत्ती आजही आहेत. पण त्या वेगवेगळ्या वेषात आहेत. माझ्यावर भागवत संप्रदायाचा प्रभाव आहे. मामासाहेब दांडेकर यांचे कीर्तन, बाळासाहेब भारदे यांची ज्ञानेश्वरी अशा अनेक प्रज्ञावंतांचा माझ्यावर प्रभाव आहे. व्यासंगा बरोबरच सत्संगातून मी घडत गेलो. माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, शरद पवार, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख अशा अनेक मोठ्या नेत्यांचा मला जवळून सहवास लाभला. मतभेद हे लोकशाही जिवंत असण्याचे लक्षण आहे असे नेहमी यशवंतराव चव्हाण सांगायचे. मी पुणे युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना पंधरा पैशाचे पोस्ट कार्डवर यशवंतराव चव्हाण यांना विनंती पत्र पाठवले होते की, पुण्यात आल्यावर त्यांनी माझ्या घरी भेट द्यावी. यानंतर १९७३ मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी यशवंतराव चव्हाण पुण्यात आले असता त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन नाना पेठ येथील माझ्या भाड्याच्या घरात भेट दिली होती.

विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आमदारांसोबत झालेल्या पहिल्या बैठकीत उल्हास पवार माझा नेता असल्याचे जाहीरपणे सांगितले होते अशी मोठी व्यक्तिमत्व राजकारणात घडली आहेत. “शहाणे” आणि “हुशार” यातील फरक समजून घेतला पाहिजे. महात्मा गांधी नेहमी सांगायचे की, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून घेतले तर बुद्ध्यांक वाढतो. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि अनेक शास्त्रज्ञ हे मान्य करतात. आधुनिक यंत्र आवश्यक आहेत पण प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच असावे. आता माणूस मोबाईलच्या आहारी गेला आहे. चार चार तासाच्या प्रवासात शेजारच्या व्यक्तीशी आपण बोलत नाहीत. तंत्रज्ञानाला विरोध नाही पण त्याच्या अतिवापराला पायबंद बसला पाहिजे. माणूस अधिक समृद्ध होण्यासाठी इंद्रायणी साहित्य संमेलनासारखी अशी अनेक संमेलने झाली पाहिजेत. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी दिलेल्या पसायदानाचे इंग्रजीत भाषांतर करून युनोच्या जिनेव्हा येथील कार्यालयात लावण्यात आले आहे यातून आपण बोध घेतला पाहिजे असेही उल्हास पवार यांनी सांगितले. स्वागताध्यक्ष संतोष बारणे यांनी स्वागत केले. आभार कार्यकारणी मंडळाचे कार्यध्यक्ष सोपान खुडे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *