अन्यथा मुख्यमंत्री हजर राहिले असते; फडणवीसांच्या उत्तरावर अजित पवार संतापले

२७ डिसेंबर २०२२

नागपुर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभागृहातील अनुपस्थितीवरुन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी जाहीर केली आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा असतानाही मुख्यमंत्री गैरहजर असून त्यांच्या वतीने इतर मंत्री उत्तर देत असल्याचं सांगत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना टोला लगावला असता सभागृहात एकच हशा पिकला. मात्र या उत्तरामुळे अजित पवार संतापले आणि फडणवीसांना सुनावलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभागृहातील अनुपस्थितीवरुन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, प्रश्नोत्तराचा दुसरा आठवडा आणि दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांकडे १४-१५ खाती आहेत. त्यांच्या खात्यासंबंधी प्रश्नांची उत्तरं शंभूराज देसाई, उदय सामंत देतात. उत्तरं कोणी द्यायची हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. देवेंद्र फडणवीसजी तुमच्याकडे सात ते आठ खाती आहेत. तुम्ही सगळ्या खात्यांसंबंधी उत्तरं देता. तुम्ही दुसऱ्या कोणाला उत्तर द्यायला सांगत नाही. तुम्ही तितके सक्षम आहात म्हणून देत असाल. तसेच फडणवीसजी तुम्हालाही आठवत असेल की, मुख्यमंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला हजर असले तर इतरांच्या उत्तरात हस्तक्षेप करत न्याय देऊ शकतात. आपण पाच वर्ष तसं करत होतात. ही एक परंपरा, पद्धत आहे. विधिमंडळाला न्याय, सन्मान आहे. आपण कायदे करतो, कायदेमंडळ आहे. कृपा करुन सरकार याची नोंद घेणार आहे का याचंही उत्तर द्या,असे अजित पवार म्हणाले.

त्यावर फडणवीसांनी उत्तर देताना “तुम्ही सभागृह चालू देणार आहे हे माहितीच नव्हतं, अन्यथा मुख्यमंत्री हजर राहिले असते” असा टोला लगावला. त्यावर सत्ताधारी आमदारांमध्ये एकच हशा पिकला. आता सभागृह चालवत आहात तर मुख्यमंत्र्यांना निरोप पाठवतो. आपलं म्हणणं योग्य असून मुख्यमंत्री उपस्थित राहतील असंही ते म्हणाले.

यावर अजित पवार यांनी फडणवीसांना सुनावलं आहे. अजित पवार म्हणाले, मग तुम्ही कसे हजर राहिलात? आपल्याला बरं माहिती असतं. मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायचं हे यांचं काम नाही का अशी विचारणाही त्यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. त्यावर फडणवीसांनी सभागृहाचं कामकाज चालू आहे कळल्यावर घाईत आलो असं उत्तर दिलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *