विद्यार्थांच्या मेंदूचा विकास होण्याकरिता गृहपाठ बंद केला जाईल – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

२६ डिसेंबर २०२२


राज्यात लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम आणि त्याच्या रचनांमध्ये बदल केले जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे न लादता, त्यांच्या मेंदूचा विकास होण्याकरिता त्याचा गृहपाठ बंद केला जाणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांचे गृहपाठ बंद करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी १६ सप्टेंबर २०२२ रोजी केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाकडे अनेक संस्थांनी या अभ्यासक्रमासाठी शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या शिफारशी लक्षात घेतल्या जाणार आहेत. सोबत राज्यातील विविध शिक्षक संघटना, संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत बैठका घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदी आणि ‘परख’ या संस्थेने केलेल्या शिफारशी, त्यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे. विद्यार्थीहित व शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने यासाठी सर्व निर्णय घेतले जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *