भामा आसखेड ते चिखली जलशुद्धीकरण केंद्र पाईपलाईनसाठी जमीन वापर हक्काचे होणार संपादन

पिंपरी : भामा आसखेड धरणापासून चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी जमीन वापर हक्क संपादन केले जाणार असून त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सहशहर अभियंता यांनी तशी मागणी पालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली होती.या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेच्या अधिकारात आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका भामा-आसखेड धरण ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ८.८ किलोमीटर लांबीची जलवाहिनी (रायझिंग लाईन) आणि १८.९० किलोमीटर लांबीची गुरूत्व जलवाहिनी (ग्रॅव्हीटी लाइन) अशी एकूण २७.७० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकणार आहे. ही जलवाहिनी महापालिका विकास योजना आराखड्या व्यतिरिक्त खेड तालुक्यातील वाकी तर्फे वाडा, करंजविहिरे या दोन गावातून तसेच मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे, जाधववाडी, जांबवडे, इंदूरी या चार गावातून अशा एकूण सहा गावांमधून येणार असून त्यासाठी जमीन वापरा हक्क संपादन केले जाणार आहेत.

शहराचा लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील सन २०३१ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिकेकडून आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आरक्षित करण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार, राज्य सरकारने आंद्रा धरणातून १०० एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी असे एकूण २६७ एमएलडी पाण्याचा कोटा २४ ऑक्टोबर २०१८ मध्ये मंजूर केला आहे. या पाण्याचा वापर शहरात नव्याने विकसित होणाऱ्या चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी आणि मोशी परिसरासाठी होणार आहे. महापालिकेने यापूर्वी आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या कामासाठी डीआरए कन्सल्टंट यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. या दोन्ही कामांचे अंदाजपत्रक डीआरए कन्सल्टंट या सल्लागारामार्फत तयार करण्यात आले आहे. भामा-आसखेड धरणामधून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १७०० मिलीमिटर व्यासाची ८.८ किलोमीटर लांबीची जलवाहिनी व १४०० मिलीमीटर व्यासाची १८.९० किलोमीटर लांबीची गुरूत्व जलवाहिनी अशी एकूण २७.७० किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही जलवाहिनी पिंपरी-चिंचवड शहर आणि शहराबाहेरून टाकण्याचे नियोजन आहे. या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *