म्हाडाच्या रस्त्यामुळे विस्थापित होणाऱ्यांचे अगोदर पुनर्वसन करा : किशोर आवारे

 

तळेगाव दाभाडे : विकास रस्त्यांच्या रुंदीकरणामध्ये ज्या नागरिकांची घरे पाडावी लागणार आहेत त्यांच्यासाठी अगोदर नगरपरिषदेने पक्क्या घरांची व्यवस्था करावी अन्यथा जनसेवा विकास समितीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी दिला आहे. या प्रकरणी त्यांनी नुकतीच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची भेट घेतली.

म्हाडातर्फे तयार करण्यात येणाऱ्या सेवारस्त्यात अडसर ठरत असलेली तळेगावातील घरे तातडीने पाडण्याच्या नोटीसा या घरांच्या मालकांना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने दिल्या आहेत . त्यामुळे या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. हे प्रकरण किशोर आवारे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आधी या नागरिकांच्या कायम निवासाची व्यवस्था करा आणि मगच त्यांची घरे पाडा असे नगरपरिषद प्रशासनाला ठणकावले आहे.

तळेगावात अनेक अनधिकृत बांधकामे अस्तित्वात आहेत. एव्हढेच नव्हे तर हरितपट्ट्यातही अनधिकृत बांधकामे होत आहेत. धनदांडग्या बांधकाम व्यावसायिकांच्या आणि राजकीय आश्रय असलेल्यांच्या बांधकामाना मुख्याधिकाऱ्यांनी अगोदर हातात लावून दाखवावा आणि मगच गरीबांची घरे पाडावीत असे आवारे यांनी म्हटले आहे. बाधित होत असलेल्या घरांच्या बदल्यात विस्थापित होणाऱ्या कुटुंबाना जो पर्यंत घरे दिली जात नाहीत तो पर्यंत एकाही घराला हात लावू देणार नाही. तसे कराल तर मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा आवारे यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक अरुण माने, रोहित लांघे, सुनील कारंडे, प्रवक्ते मिलिंद अच्युत, कल्पेश भगत, सुनील पवार, अनिल भांगरे आदी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या दालनात उपस्थित होते.‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *