जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबाबत अपशब्द वापरल्याने अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई

२२ डिसेंबर २०२२


विधीमंडळ अधिवेशनात सत्ताधाऱ्यांकडून दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात यावी असे सांगण्यात आले. आक्रमक होणाऱ्या विरोधी पक्षाला विशेषत: शिवसेना ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून दिशा सालियानच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशीची मागणी लावून धरली. विधानसभेमध्ये दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून अनेक दावे करण्यात आले होते. यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे ६ वेळा कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांकडून आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली.

सत्ताधारी बाकावरून 14 जणांना बोलण्याची संधी दिली आणि विरोधी बाकावरून एका सदस्याला बोलण्याची संधी दिली पाहिजे अशी मागणी करण्यात येत होती. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त करत तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका, असे म्हटले. जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणखीच आक्रमक झाले. सत्ताधाऱ्यांकडून जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांविषयी काढलेल्या अपशब्दामुळे विधानसभेतलं वातावरण तापलं आणि सत्ताधाऱ्यांनी थेट जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी केली, यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटलांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *