तुम्ही खोके मोजत बसा, आम्ही अपमानाविरोधात लढत राहू; संजय राऊत यांची ईडी सरकारवर टीका

१७ डिसेंबर २०२२

मुंबई


महापुरुषांच्या अपमानाविरोधात महाराष्ट्रप्रेमींनी आज मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. हा मोर्चा म्हणजे काम नसल्याचा प्रकार असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जात होती. ही टीका करणाऱ्या मिंधे सरकारचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधात आवाज उठवणं हा काम नसल्याचा प्रकार आरोप करणे हा तर सगळ्यात मोठा अपमान आहे, आपण काय बोलतोय याचे मुख्यमंत्र्यांना भान आहे का?’ असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

संजय राऊत म्हणाले की ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधात आवाज उठवणं हा काम नसल्याचा प्रकार आरोप करणे हा तर सगळ्यात मोठा अपमान आहे, मुख्यमंत्र्यांना काय बोलताय याचे भान आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा राज्यपाल हा राजभवनात बसलाय. महापुरुषांचा अपमान करणारा मंत्री तुमच्या बाजूला बसलाय, एक जण दिल्लीत बसलाय. यांचा मेंदू आहे कुठे ? का दिल्लीला गेले होते तेव्हा त्यांच्या पायाशी गहाण ठेवून आले आहेत ? आम्हाला काम आहे, अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे म्हणून आम्ही हे काम हाती घेतलं आहे. तुम्ही लाचार आणि मिंधे आहात म्हणून तुम्ही हा अपमान सहन करत आहात. खोकी मोजत बसा, आम्ही अपमानाविरूद्ध लढत बसू.

या सरकारमध्ये जर कोणी महाराष्ट्रप्रेमी उरले असतील तर त्यांनीही मोर्चात सामील व्हावं, पण त्यांचं महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली दबलं आहे, चिरडलं गेलंय, असं संजय राऊत यांनी म्हटलं. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बंदबाबतचा प्रश्न ऐकून म्हटले की, ‘माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, त्यांच्यात महाराष्ट्र प्रेमाचा अंश शिल्लक असेल तर त्यांनी आजचा ठाणे बंद मागे घ्यावा. मुख्यमंत्र्यांची ताकद ही पाचपाखाडी आणि वागळे इस्टेट बंद करण्याइतकीच आहे. ते बंद करून आमच्या मोर्चात सामील व्हा.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *