भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस

१५ डिसेंबर २०२२


भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताने बांगलादेशची अवस्था ८ बाद १३३धावा अशी केली. मोहम्मद सिराजने बांगलादेशची टॉप ऑर्डर उडवली तर कुलदीपने मधल्या फळीला खिंडार पाडले. सिराजने 14 धावात 3 तर कुलदीपने ३३ धावात ४ विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव ४०४ धावात संपुष्टात आला. दुसऱ्या दिवशी आर. अश्विनने ५८धावा तर कुलदीप यादवने ४० धावांचे योगदान दिले. बांगलादेश पहिल्या डावात २७१ धावांनी पिछाडीवर आहेत.

बांगलादेश संघाला पहिला धक्का नजमुल हुसेन शांतोच्या रुपाने बसला. तो संघाचे आणि स्वत:चे खात्य उघडण्या अगोदर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ यासिर अली देखील ४ धावा काढून बाद झाला. त्यामुळे बांगलादेश संघ अडचणीत आला. त्यानंतर २४.२ षटकात बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत परतला होता. तेव्हा संघाची धावसंख्या ७५ अशी होती. दरम्यान यानंतर ही संघाची पडझड सुरु राहिल्याने संघ दबावात सापडला.

बांगलादेशकडून फलंदाजी करताना मुशफिकर रहीमने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५८ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. त्याचबरोबर लिटन दास (२४) आणि झाकिर हसनने (२०) थोड्या प्रमाणात धावा केल्या. मात्र इतर चार फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या सुद्धा पार करता आली नाही. त्यामुळे बांगलादेशने ४४ षटकाच्या समाप्तीनंतर ८ बाद १३३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारताच्या तुलनेत २७१ धावांनी मागे आहेत.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मेहदी हसन १६ आणि इबादोत हुसेन १३ धावांवर नाबाद आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, फिरकीपटू कुलदीप यादवने सर्वादिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद सिराजने दुसऱ्या बाजूने वेगवान मारा सुरुच ठेवताना ३ विकेट्स घेतल्या. तसेच उमेश यादवने १ विकेट घेतली.