चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण, अखेर १० पोलिसांचे निलंबन मागे

१५ डिसेंबर २०२२

पिंपरी


राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दहा पोलिसांचे निलंबन केले. या प्रकरणाच्या चौकशीअंती संबंधित पोलिसांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर (गुन्हे शाखा युनिट दोन), पोलिस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे (अनैतिक मानवी वाहतूक कक्ष), पोलिस उपनिरीक्षक गणेश माने (चिंचवड पोलिस स्टेशन- आरसीपी प्रभारी), सहायक फौजदार भाऊसाहेब सरोदे (गुन्हे शाखा युनिट दोन), सहायक फौजदार दीपक खरात (गुन्हे शाखा युनिट दोन), पोलिस हवालदार प्रमोद वेताळ (गुन्हे शाखा युनिट दोन), पोलिस नाईक देवा राऊत (गुन्हे शाखा युनिट दोन), पोलिस नाईक सागर अवसरे (गुन्हे शाखा युनिट दोन), महिला पोलिस नाईक कांचन घवले (चिंचवड पोलिस स्टेशन), महिला पोलिस शिपाई प्रियंका गुजर (पोलिस मुख्यालय) अशी निलंबनमुक्त झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

चंद्रकांत पाटील, चिंचवड येथील एका कार्यक्रमासाठी आले असता एका कार्यकर्त्याच्या घरातून कार्यक्रम स्थळी जाताना कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. त्यानंतर शिस्तभंगाचा ठपका ठेवत पोलिस आयुक्तांनी तीन अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. दरम्यान, या प्रकरणाची पोलिस उपायुक्तांकडून चौकशी करण्यात आली. मंगळवारी रात्री पोलीस उपायुक्तांनी चौकशीचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला. त्यानंतर निलंबित पोलिसांना निलंबनातून मुक्त करून त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी कर्तव्यासाठी सेवेत पुनःस्थापित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त शिंदे यांनी दिले.