पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत ५०१ कोटी रुपयांचा मिळकतकर जमा

१५ डिसेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड शहरातील तीन लाख मिळकतधारकांनी साडेआठ महिन्यांत ५०१ कोटी रुपयांचा मिळकतकर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागाने जाहीर केलेल्या विविध सवलत योजना व जप्तीच्या मोहिमेमुळे विक्रमी वसुली झाली आहे. उर्वरित मिळकतधारकांनी कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

पालिकेकडे शहरातील ५ लाख ८८ हजार मिळकतींची नोंद आहे. एक एप्रिल ते १३ डिसेंबर २०२२ असे साडेआठ महिन्यांत ३ लाख १ हजार ४३४ मिळकतधारकांनी ५०१ कोटी ४० लाख रुपयांचा भरणा केला आहे. विभागाने ३१ मार्च २०२३ पर्यंत १ हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किमान ८५ टक्के मिळकतींचा कर वसूल करणे आवश्यक आहे. तो पल्ला गाठण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करसंकलन विभागाने कंबर कसली आहे.