शिवाजी महाराजांची बदनामी केली जातेय, विकृती रोखली पाहिजे – उदयनराजे भोसले

१५ डिसेंबर २०२२


थोर पुरुष होते म्हणून आपण लोकशाहीत वावरतो आहे. ते नसते, तर आपण गुलामगिरीत असतो. परंतु, त्यांची बदनामी केली जाते त्याचे वाईट वाटते. थोर पुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विकृतीत वाढ झाली आहे. ती वेळीच रोखली पाहिजे, असं आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं.

जग खूप वेगाने पुढे जात आहे. लोक फारसा विचार करत नाही. लोकांनी विचार करायचं बंद केलं आहे. प्रत्येकाचं जीवन व्यस्त झालं आहे. लोक कामात मग्न झाले आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मूलभूत विचाराचा लोकांना हळूहळू विसर पडू लागला आहे. हे एका दिवसात झालं नाही, अशी सल उदयनराजे भोसले यांनी बोलून दाखवली.

शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला होता. तो विचार राहिला आहे का? कारण नसताना जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे. भेदभाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे सर्वधर्म समभाव हा विचार मागे पडताना दिसत आहे. राज्यकर्त्यांनी नेहमीच आपला वैयक्तिक स्वार्थ पाहिला. लोकशाहीतील राजांनी दिलं तरी काय? आपण इस्लामिक देश पाहिले तर तिथे आजही राजेशाही आहे. राजेशाही अस्तित्वात ठेवावी असं शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर आजही या देशात राजेशाही राहिली असती. लोकांचा राज्यकारभारात सहभाग असावा असं शिवाजी महाराजांना वाटलं आणि लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली, असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

आज लोकशाहीच्या नावाखाली देशात घराणेशाही आली आहे. त्याच त्याच घरातील लोक सत्तेत येऊ लागले आहेत. याच लोकांना ज्ञान आहे आणि इतरांना नाही, असं बिंबवलं जात आहे. त्यामुळे विकेंद्रीकरणाची संकल्पना मागे पडली आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सर्वसामान्यांच्या हाती सत्ता आली पाहिजे, अशी गांधीजींची भूमिका होती. पण ते झालं नाही. आज घराणेशाही निर्माण झाली आहे. मूठभर लोकांच्या हाती सत्ता आली आहे. राजकारणात घराण्याची मक्तेदारी वाढली आहे, अशी टीका त्यांनी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *