सीमावाद पेटवणारा मास्टरमाइंड शोधा; अजित पवारांची मागणी

१५ डिसेंबर २०२२


ज्या ट्विटर अकाऊंटवरून माझ्या नावाने ट्विट करण्यात आलं, ते ट्विटर अकाऊंट माझं नव्हतं, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ट्विटरवर कोणी जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का? याची शहानिशा करून दूध का दूध आणि पानी का पानी करावं. तसेच यामागचा मास्टरमाइंड शोधावा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

काल चर्चा झाली की यामागचा सूत्रधार कोण आहे? हे का घडलं? यात जाणीवपूर्वक कुणी बातम्या सोडल्या? त्यातून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊन या सगळ्या गोष्टी घडल्या. काहींना वाटतंय की हे विरोधकांनी केलं. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही नेहमीच राज्याच्या एकसंधतेला धक्का लागणार नाही हाच दृष्टीकोन ठेवत असतो. तरीही जर कुठली शंका केंद्राला वाटत असेल, तर त्यातलं दूध का दूध, पानी का पानी समोर आलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

बोम्मई यांनी तसं स्टेटमेंट केलं नसतं तर हा वाद निर्माण झाला नसता. अशा प्रकारातून महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचं काम हे करत असल्याची भावना राज्याच्या लोकांमध्ये निर्माण झाली आहे, असंही अजित पवार म्हणाले म्हणाले.