पवना नदीपात्रामध्ये मृत मासे आढळून आल्यानंतर येथील जलपर्णी काढण्याचे काम सुरू

१५ डिसेंबर २०२२

पिंपरी


पवना नदीपात्रामध्ये थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्याजवळ मंगळवारी (दि.१३) मृत मासे आढळून आल्यानंतर येथील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. माशांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जलपर्णी काढण्याबाबत जाग आली आहे. नदीपात्रात बुधवारी देखील फेसयुक्त पाणी पाहण्यास मिळाले. पवना नदीतील वाढत्या जल प्रदूषणामुळे जलचरांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबत ठोस उपाययोजना करत नसल्याने माशांना आपला जीव गमवावा लागला.

पाण्यातील मिसळलेल्या ऑक्सिजनचे (डिझॉल्व्ह ऑक्सिजन) प्रमाण कमी झाल्याने प्रामुख्याने ही समस्या निर्माण होत असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाण्याचा व मृत माशांचा नमुना घेतलेला आहे. तसेच, याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. या पूर्वी देखील येथील नदीपात्रामध्ये केजुदेवी बंधार्याजवळ मासे मृत होण्याचे प्रकार घडलेले आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून याबाबत जुजबी उपाययोजना करण्यात आल्या.

केजुदेवी बंधाऱ्याजवळ जलपर्णी काढण्याचे काम सध्या ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आले आहे. येथे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचल्याने ते सर्व काढण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागू शकतो. केजुदेवी बंधारा येथे मृत मासे आढळल्यामुळे येथील माशांचा व नदीतील पाण्याचा नमुना घेण्यात आलेला आहे. त्याच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेला अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत प्रादेशिक अधिकाऱ्यांमार्फत प्रस्तावित आदेश बजाविण्यात येणार आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *