हे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे; अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

१० डिसेंबर २०२२


कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्न चांगलाच चिघळला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात मध्यस्थी करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र, त्यापूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलं आहे. महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही, असे बोम्मई म्हणाले आहेत. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

अजित पवार म्हणाले की, कर्नाटकातून महाराष्ट्राला रोज शिव्या घातल्या जात आहेत. आपली वाहने फोडली जात आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री एवढे बोलतात मग त्यांच्या आरेला कारे करा ना. ते बोलणार आणि इथलं सरकार गप्प बसणार. आम्ही करतो..आम्ही करतो.. अरे पण काय करतो? तुमचे दोन मंत्री तिथे जाणार होते त्यांना यायचं नाही म्हणून सांगितलं. महापरिनिर्वाण दिनाचं कारण पुढे करत ते मंत्री कर्नाटकात गेले नाहीत. महापरिनिर्वाण दिन आहे हे तुम्हाला आधी कळलं नाही का? हे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असे झाले.

यावेळी ते म्हणाले की, कर्नाटकवाले शिव्या घालत आहेत. आपल्या गाड्या फोडत आहेत. अमित शहांनी या विषयावर बैठक घेतो असं म्हटल्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले, मी बठकीला येणार नाही आणि एक इंचही जागा सोडणार नाही. अरे पण चर्चेतून मार्ग निघेल ना. मी सरकारमध्ये असताना अर्थसंकल्पात जे जाहीर केलं होतं त्यालाही या सरकारने स्थगिती दिली. त्यामुळे अनेक गावांचा निधी थांबला. कुणाच्या घरचा निधी आहे का हा? सरकारचा निधी आहे. तुमचं सरकार आहे तर तुम्ही नवीन मंजुऱ्या द्या ना असे ते म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *