ओला-सुका कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा – अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ

०९ डिसेंबर २०२२

पिंपरी


ओला व सुका कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांची नोंद करून घ्यावी. सूचना देऊनही कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया गतिमान करावी, अशी सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिल्या.

वाघ म्हणाले, की पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अद्यापही काही नागरिक कचरा विलगीकरण करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी प्रत्यक्ष कचरा विलगीकरण करण्याच्या मोहिमेत सक्रीय सहभाग घेत स्वतःच्या घरात विलगीकरण केलेला कचरा घंटा गाडीत टाकताना वेगवेगळा द्यावा. ओला, सुका, घरगुती घातक, सॅनिटरी वेस्ट व प्लास्टिक अशा वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये टाकावा. याबाबत घंटागाडी सोबत असलेल्या कर्मचार्यांनी नागरिकांना मार्गदर्शन करावे. तसेच घंटागाडीवर वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये टाकावयाच्या कचऱ्याचे नागरिकांना स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने तपशीलवार स्टिकर लावावेत.